ठाणे : मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा ठाणे मतदारसंघात मतदानाची टक्केवारी तीन टक्क्यांनी वाढली आहे. मीरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा आणि ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली, तर बेलापूर, ऐरोली आणि कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा क्षेत्रातही मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. कोपरी-पाचपाखाडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे, तर बेलापूर, ऐरोलीवर भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, मीरा-भाईंदर व ठाणे या भाजपचे वर्चस्व असलेल्या विधानसभा क्षेत्रातील मतांची वाढ कुणासाठी लाभदायी ठरणार याबाबत चर्चा सुरु आहे.
ठाणे लोकसभेत यंदा प्रथमच दोन शिवसेनेत सरळ लढत झाली. एकीकडे पक्ष आणि चिन्ह, तर दुसरीकडे ठाकरे ब्रॅण्ड अशी ही निवडणूक झाल्याने आता मतांचे प्रमाण लक्षात घेता कुणाला लाभ व कुणाला घाटा, याचे हिशेब मांडले जात आहेत. मागील वेळी राजन विचारे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. यावेळी नरेश म्हस्के अथवा विचारे यांच्यापैकी जो कुणी विजयी होईल तो फार थोड्या मताधिक्क्याने विजयी होईल, असे मतदानाच्या आकडेवारीवरून तर्क लढविले जातात. ठाणे लोकसभेत यंदा सुमारे ५२.०९ टक्के मतदान झाले. मागील वेळेस ४९.३९ टक्के मतदान झाले होते. यंदा तीन टक्क्यांची भर पडली. ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये ५१.९३ टक्के मतदान झाले होते.
यंदा कोपरीत ५६.२५ टक्के मतदान झाले. या ठिकाणी सुमारे ५ टक्के मतदानाची वाढ ही म्हस्केंसाठी जमेची बाजू मानली जाते. ठाणे विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे आमदार संजय केळकर यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मागील निवडणुकीत ६०.३० टक्के मतदानाची नोंद झाली. यंदा ५९.५२ टक्के मतदानाची नोंद झाली. ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपली नाराजी वरिष्ठांपुढे मांडली होती.