कल्याण : केडीएमसीच्या परिवहन, शिक्षण आणि १० प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक १२ जूनला होत आहे. सोमवारी यासंदर्भात उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. परिवहन आणि शिक्षण समिती सभापतीपदाची टर्म शिवसेनेची असल्याने त्या पक्षाकडून सभापतीपदाचे उमेदवार म्हणून कोणाचे नाव पुढे येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महापालिका सचिव संजय जाधव यांच्याकडे सोमवारी सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत अर्ज दाखल करायचे आहेत. १२ जूनला निवडणुकीच्या दिवशी उमेदवारी अर्जांची छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. परिवहन समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो आणि हे पद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेचे सध्या सात सदस्य समितीमध्ये आहेत. सभापतीपदाची टर्म आता शिवसेनेची आहे. १३ सदस्य असलेल्या समितीमध्ये मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव, सुनील खारूक, अनिल पिंगळे, बंडू पाटील हे सभापतीपदाचे दावेदार मानले जातात. त्यामुळे यांच्यापैकी कोणाला सभापतीपदाची संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे परिवहन सभापतीपदाचा कालावधी एक वर्षाचा असतो. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित होते.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली ही निवडणूक जूनमध्ये होत असल्याने निवडून येणाऱ्या नव्या सभापतींना नऊ महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. दुसरीकडे मार्चमध्ये मुदत संपुष्टात येऊनही आचारसंहितेमुळे शिक्षण समिती सदस्यांची नियुक्तीही वेळेवर होऊ शकली नव्हती. ही प्रक्रिया ९ मे रोजी पार पडली. पक्षीय बलाबलानुसार समितीमध्ये शिवसेना ५, भाजप ४, मनसे आणि काँग्रेस प्रत्येकी १ अशी स्थिती आहे. गेल्यावर्षी शिक्षण समितीचे सभापतीपद भाजपच्या वाट्याला गेले होते.शिवसेनेची टर्म असून कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या नमिता पाटील, माधुरी काळे, छाया वाघमारे, भारती मोरे यांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहेत. यापैकी कोणाला संधी मिळते, हे चित्रदेखील सोमवारी स्पष्ट होणार आहे. १० प्रभाग समिती सभापती निवडीसाठीही सोमवारी अर्ज सादर करण्यात येणार आहेत.शिक्षण आणि परिवहन समिती सभापतीपदाची यंदा शिवसेनेची टर्म आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. पण, अर्ज दाखल करणाºया उमेदवारांची नावे सोमवारीच जाहीर केली जातील.-दशरथ घाडीगावकर,शिवसेना गटनेते