प्रशांत माने / कल्याणमहिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य परिवहन विभागाने अबोली रंगाच्या रिक्षांची खास तरतूद केली. ठाण्यात मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग यशस्वीही झाला. मात्र, कल्याण आरटीओच्या हद्दीत २७ महिलांनी या रिक्षांचे परमिट घेतले आहे. त्यापैकी आठ जणींनी रिक्षाही घेतल्या आहेत, मात्र त्या रस्त्यावर धावताना दिसत नाहीत.महिलांना स्वयंरोजगार मिळावा, यासाठी अबोली रिक्षांचा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. अन्य शहरांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांची सबलीकरणाकडे वाटचाल सुरू असताना कल्याण हद्दीत मात्र याउलट चित्र आहे. ठाणे शहरात सुमारे २५ हजारांहून अधिक रिक्षा धावतात. ठाण्यात घडलेल्या स्वप्नाली लाड प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अबोली रिक्षा सुरू करताना महिलांच्या सुरक्षेचा हेतूही समोर होता. ठाण्यात अबोली रिक्षाच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ९० च्या आसपास महिला रिक्षा चालवत आहेत. दुसरीकडे कल्याण आरटीओने २७ महिलांना अबोली रिक्षाचे परमिट दिले आहे. यातील आठ महिलांनी रिक्षाही घेतल्या आहेत. परंतु, यातील एकही रिक्षा अजूनही रस्त्यावर धावलेली नाही. परमिट घेतले, मग रिक्षा चालवणार तरी कधी, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. परमिट घेऊन ते अन्य रिक्षाचालकांना चालवण्यास दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून आरटीओने असे परमीट खऱ्या गरजू महिलांना देणे अपेक्षित आहे. योग्य कारवाई करणार : आरटीओकल्याण आरटीओचे अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी महिलांकडून रिक्षा चालवल्या जात नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. परमिट घेतलेल्या, पण रिक्षा न चालवणाऱ्या महिलांचा भरारी पथकांद्वारे योग्य तपास करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ...तर स्वतंत्र रांग ठेवणारज्या महिलांनी परमिट घेतले आहे, त्यांची माहिती आरटीओदप्तरी आहे. त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी. महिलांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात येईल, असे पेणकर यांनी स्पष्ट केले. महिलांना पाच टक्के परमिट कोकण रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनीही याप्रकरणी ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी केली. एकूण कोट्याच्या पाच टक्के परमिट महिलांना उपलब्ध करून देण्याचे आदेश परिवहनमंत्री रावते यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली खरी, परंतु कल्याणमध्ये महिला रिक्षा चालवत नसल्याने सक्षमीकरणाचा उद्देश सफल होताना दिसत नाही.
कल्याणमध्ये कोणी पाहिली का हो ‘अबोली’
By admin | Published: February 18, 2017 5:06 AM