लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्यावर फेसबुकवर हीन दर्जाची आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिच्या कळंबोलीतील घरातून ठाणे पोलिसांनी एक लॅपटॉप आणि एक मोबाइल सोमवारी हस्तगत केला. तिने अशी पोस्ट करण्यामागे आणखी काही कारणे आहेत का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
केतकी हिच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कळंबोली पोलिसांनी तिला १४ मे रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने तिला त्याच दिवशी अटक केली. त्याचवेळी तिच्या ताब्यातून एक मोबाइल पोलिसांनी जप्त केला. सध्या तिला १८ मेपर्यंत ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
गुन्हा एकच तरी अनेक ठिकाणी दाखल
केतकीने केलेला गुन्हा एकच आहे. मात्र, तरीही तिच्याविरुद्ध राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईतील गोरेगाव, ठाण्यातील कळवा यासह पुणे, धुळे, नंदुरबार, पारनेर, कुडाळ, उस्मानाबाद अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मुळात, एकच गुन्हा असल्यामुळे तो एकाच ठिकाणी वर्ग करून तपास होणे अपेक्षित असल्याचे मत एका निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.
कळंबोलीतील तिच्या घरी ठाणे पोलिसांनी पंच तसेच केतकीच्या उपस्थितीमध्ये आणखी एक मोबाइल आणि लॅपटॉप हस्तगत केला. फेसबुकवरील पोस्ट ही मोबाइलवरून केल्याचा तिचा दावा आहे. याची पडताळणी करण्यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सायबरसह चार पथके : याच्या तपासासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची तीन पथके तसेच सायबर गुन्हे अन्वेषण विभागाचे एक अशी चार पथके कार्यरत आहेत. सायबरमार्फत तांत्रिक विश्लेषण करून नेमका कोणत्या मोबाइल किंवा लॅपटॉपचा यासाठी वापर झाला, याचा तपास केला जात आहे.