Akshay Shinde Encounter ( Marathi News ) : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला काल एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलं. मुंब्रा बायपास येथे अक्षयने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून तीन राउंड फायर केले. यात मोरे जखमी झाले. अचानक घडलेल्या या घटनेनंतर तो तावडीतून पळून जाऊ नये, म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून एक गोळी झाडली. या एका गोळीतच अक्षय शिंदे ठार झाला. या एन्काउंटर प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून या प्रकरणातील अन्य आरोपींना वाचवण्यासाठीच हा एन्काउंटर घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशातच आरोपी अक्षय शिंदे याच्यावर गोळी झाडणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्याविषयी नवी माहिती समोर आली आहे.
अरुण टिकू हत्याकांडातील आरोपी विजय पालंडे याला पोलीस कस्टडीतून फरार होण्यास मदत केल्याचा आरोप झाल्याने पोलीस अधिकारी संजय शिंदे यांचं निलंबन झालं होतं. तसंच त्यांना सेवेतून बरखास्त करण्याचा प्रस्तावही पोलीस महानिरीक्षक कार्यालयाला पाठवण्यात आला होता. मात्र पोलीस महानिरीक्षकांना हा प्रस्ताव नाकारल्याने संजय शिंदे पुन्हा पोलीस विभागात कार्यरत झाले. हेच संजय शिंदे आता बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काउंटरमुळे चर्चेत आले आहेत.
दरम्यान, संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं आहे. तसंच त्यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केलं आहे. तत्कालीन आयपीएस प्रदीप शर्मा त्याचे नेतृत्व करत होते. इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्येही संजय शिंदे यांचा समावेश होता.
एन्काउंटरनंतर निर्माण झाले अनेक प्रश्न
- आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलिस स्टेशनला का नेण्यात आले?
- पोलिसांची रिव्हॉल्वर सहसा लॉक असते. आरोपीच्या चेहऱ्यावर काळ्या कपड्याचा मास्क होता. त्यातून त्याला पोलिसांच्या खिशाला लावलेले रिव्हॉल्वर दिसले. ते त्याने हिसकावून घेतले. त्यावेळी त्याच्या हातात बेड्या होत्या की नव्हत्या? रिव्हॉल्वर लॉक होते तर ते आरोपीला कसे उघडता आले?
- पाच-सहा पोलिस गाडीत होते. एकच आरोपी होता. मग दाटीवाटीत गाडीत बसलेल्या पोलिसांवर त्यांचीच रिव्हॉल्वर हिसकावून घेत जीवघेणा हल्ला करणे आरोपीला कसे शक्य झाले?
- पोलिसांनी प्रतिरोध करताना बळाचा योग्य प्रमाणात वापर केला होता का?
- आरोपी अक्षय शिंदेला चौकशीसाठी नेताना त्याच्या हातात बेड्या घातल्या होत्या का?
- कुठल्याही आरोपीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना त्याच्या आजूबाजूला किमान चार ते पाच पोलिस असतात. अक्षय शिंदेभोवती किती पोलिस होते? त्या सगळ्यांना चकमा देऊन त्याने रिव्हॉल्वर घेतले का?
- या घटनेचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी २४ तास लावले. काही पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप होत होता. त्याची आता चौकशी होणार का?
- संबंधित शाळेच्या संस्थाचालकांना अद्यापही अटक करण्यात पोलिसांना यश का आले नाही?
- या प्रकरणात नुकतेच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले होते. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार होती. आता या सुनावणीचे पुढे काय होणार?
- अक्षय शिंदे यांच्या आई वडिलांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये थेट आरोप केला आहे की पोलीस कस्टडीत असताना त्याला भरपूर मारहाण करण्यात आली होती. हे खरे आहे का?
- बदलापूरच्या ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यांना अटक झाली नव्हती. त्यांना वाचवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याच्या विरोधकांच्या आरोपाला काय उत्तर?
- या घटनेमुळे पोलिसांच्या पुढील तपासाला ब्रेक लागणार आणि हे प्रकरण संपूर्णपणे शांत होणार का?