ठाणे : विनयभंगाच्या गुन्ह्यात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळाल्याचा कोणताही आनंद नाही. उलट, अशा प्रकारच्या गुन्ह्यात आपल्याला गोवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, याचे दु:ख आहे. यामागे कोण शकुनी मामा आहे, याचाही शोध घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यक्त केली.
आव्हाड म्हणाले की, आपण या गुन्ह्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज करणार नव्हतो. परंतु कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा अर्ज केला. संपूर्ण व्हिडीओमध्ये ती भगिनी समोरून चालत येताना दिसते. तिच्या मनात हे सगळे ठरलेले असावे. कारण मी तिला बाजूला केले नसते तर ती आपल्या अंगावरच पडली असती. नंतर एक मोठा गुन्हा आपल्यावर दाखल झाला असता. पण मी तिला बाजूला केले. मला अडकविण्यासाठी हे सगळे रचले होते. पण देवानेच मला वाचवल्याची भावना आव्हाड यांनी व्यक्त केली.
आपल्यावर पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. त्यातून तडीपार करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले.
राजीनाम्यावर निर्णय नाही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यावरच राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेऊ. कारण आपल्याशी बोलल्याशिवाय काही पाऊल उचलायचे नाही, असा वडीलकीचा सल्ला पवार यांनी दिल्याचेही ते म्हणाले. हिंदू-मुस्लीम वाद घडवायचा हाेतामुंब्र्यात १३ वर्षे कधी तणाव निर्माण झाला नव्हता. या निमिताने हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद घडवण्याचा प्रयत्न केला. त्याला जबाबदार एक व्यक्ती आहे. ती घरात बसली असून संबंधित महिला बाहेर आहे. मुंब्र्यातील पुलाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीच्या नगरसेविकेलाही धक्काबुक्की झाली. त्याच्यावर कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी केला.