कल्याण : नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी कल्याण-डोंबिवली शहरांत देशभरातून लोक येतात व भाड्याने खोली किंवा घर घेऊन राहतात. मात्र, आपण ठेवलेल्या भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देऊन शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता सहकार्य करण्याचा सपशेल विसर सुशिक्षितांच्या शहरातील बहुतांश घरमालकांना पडलेला आहे. अशी माहिती देण्याबाबत कठोर कायदे करूनही लोकांचा प्रतिसाद थंड असल्याबद्दल पोलिसांकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे.रोजगाराकरिता देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून येणारे लोक कल्याण, डोंबिवली शहरांत स्थायिक होतात. बेरोजगारीमुळे सोनसाखळीचोरी, घरफोड्या, लुटमारी या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. यातील बहुतांश घटनांमधील आरोपी हे गुन्हा करण्यासाठी भाड्याच्या घरात राहत असल्याचे कालांतराने तपासात उघड झाले आहे.उन्हाळी सुट्या हा घरफोड्या वाढण्याचा काळ. त्यामुळे या काळात शहरांत येणाºया व भाडेतत्त्वावर घरे घेणाºया घरांच्या मालकांनी भाडेकरूंची माहिती, भाडेकरार आणि त्यांचे छायाचित्र, त्याचा व्यवसाय, मूळ पत्ता, राहण्याचा उद्देश आदी माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. मात्र, स्थलांतरितांना घर भाड्याने देताना मालक भाडेकरूंची धड प्राथमिक माहिती न घेता घरे भाड्याने देतात. महिन्याला चांगले पैसे मिळतात, एवढ्यावरच समाधान मानतात.घरी काम करणारे नोकर, सुरक्षारक्षक आणि भाडेकरू यांची इत्थंभूत माहिती देण्यासाठी सक्ती करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. पोलिसांनी ही माहिती मागितली आणि ती देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांना दंड किंवा शिक्षा होऊ शकते. भाडेकरूला घर दिल्यानंतर घरात किंवा शहरात गुन्हा घडल्यास पोलिसांना त्याचा तपास करण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. मात्र, या कायद्याचा सुशिक्षितांच्या शहराला विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. या कायद्याबाबत पुरेशी जनजागृती नसल्यामुळे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहत असलेल्या सुशिक्षितांनाही या नियमाची माहिती नाही.
आप के घर में कौन रहता है?, सुशिक्षितांची मिठाची गुळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:51 AM