ठाणे : बाळासाहेब ठाकरे हेच आदर्श असल्याचे सांगत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेविरोधात संघर्षाचे बिगुल फुंकले आहे. शिवाय केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला टीकेचे लक्ष्य करून त्यांनी भाजप-संघ परिवाराच्या वातारवरण निर्मितीच्या मनसुब्यांना सुरूंग लावल्याने पालिका निवडणुकीत हा पक्ष युतीतील शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांची मते फोडण्याचेच काम करेल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या याच व्यूहरचनेचा वापर ठाण्यातही केल्यास येथील पालिका निवडणुकीतही मनसेचा उपद्रव वेगवेगळ््या लढणाऱ्या शिवसेना-भाजपाला होण्याची शक्यता आहे.मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून पक्षाची पुढील वाटचाल स्पष्ट होईल, असेच मानले जात होते. मुंबई, ठाणे, उल्हासनगरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या आदर्शावरच मनसेची वाटचाल सुरू राहील, अशी अटकळ त्यामुळेच व्यक्त होते आहे. ठाण्यात मनसेची संघटना विसविशीत आहे. परमार प्रकरणापासून वेगवेगळ््या अंतर्गत वादांचा फटका पक्षाला बसला आहे. येत्या सहा-आठ महिन्यांत संघटनेची बांधणी करू शकेल, असा चेहरा पक्षाकडे नाही. त्यामुळे मराठी-परप्रांतीय, फडणवीस-मोदी सरकारचा कारभार यावर भर देत मनसेच्या प्रचाराची आखणी होईल. ठाण्यात शिवसेनेची दीर्घकाळ सत्ता असल्याने त्या पक्षाच्या कारभाराची चिरफाड करण्यावरही मनसेचा भर राहील, असे मानले जाते. ठाण्यात मनसेने शिवसेनेला विरोध करतानाच गरजेच्यावेळी सांभाळून घेण्याचेही धोरण स्वीकारले होते. त्यामुळे ठाण्याच्या विकासाचा मुद्दाच निवडणुकीत असेल आणि त्याची वातावरणनिर्मिती करण्यात मनसे अग्रेसर असेल असे मानले जाते.एमआयएमला फटका ठाण्यात मुंब्रा-राबोडी परिसरात एमआयएम थोडा फार जोर लावेल, असा अंदाज आहे. मात्र त्या पक्षाला भाजपा आर्थिक साह्य करीत असल्याचा आरोप राज यांनी केल्याने त्या पक्षाच्या भूमिकेबद्दल निवडणुकीत संशय निर्माण होण्यास जागा आहे. शिवाय एमआयएमने कोणतेही ठोस काम किंवा संघटना बांधणीही पुरेशी न केल्याने ती कितपत सक्षमपणे निवडणुकीत उतरतील, याबद्दल शंका आहे. शिंदे की शिवसेना हाच पेचशिवसेनेचे ठाण्यातील मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांच्याशी राज ठाकरे यांचे चांगले संबंध असल्याचे मानले जाते. त्याचा प्रत्यय यापूर्वीही आला आहे. त्यामुळे शिंदे यांना पाठिंबा आणि त्याचवेळी शिवसेनेला विरोध अशी दुहेरी भूमिका मनसेला पार पाडावी लागणार आहे. त्यातही शिवेसनेतील शिंदे यांच्या विरोधकांना मनसे कसे उत्तर देते यावरच बरीच समीकरणे अवलंबून असतील.भाजपाला फटका : भाजपाशी आधी सलोख्याचे संबंध असलेल्या राज यांची त्या पक्षाबद्दलची भूमिका गेल्या काही महिन्यांत बदलत गेली आहे. केंद्रासोबत राज्य सरकारवर टीका केल्याशिवाय त्यांचे एकही भाषण पूर्ण होत नाही. त्यातही संघ परिवारावर आणि त्यांच्या कुजबुज ब्रिगेडवरही ते सतत हल्ला चढवत असल्याने ठाण्यात मनसेने जोर लावल्यास त्यातून भाजपच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीपूर्वी वातावरण निर्मिती करण्याच्या भाजपा आणि संघ परिवाराच्या प्रयत्नांना ते खो घालू शकतात, असे मानले जाते.
मनसेचा उपद्रव नेमका कोणाला?
By admin | Published: April 10, 2016 1:22 AM