कल्याण : कल्याणच्या पत्रीपूल येथील सूर्यमुखी-लोकसुरभी सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील १०२ क्र.च्या फ्लॅटमध्ये रिझवान खान राहत आहे. त्याची पत्नी रुकाया, मुलगी फतिमा, मारियान आणि मुलगा बिलाल असा परिवार आहे. त्याची मुले कल्याणच्या इकरा उर्दू शाळेत शिक्षण घेतात. विक्र ोळी येथे राहणारे अंजुम सलीम भाटकर यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये आॅक्टोबर २०१४ पासून रिझवान भाड्याने राहत आहे. फ्लॅट भाड्याने घेताना आपण मुलांच्या शिकवण्या घेण्याचे काम करीत असल्याचे त्याने घरमालक भाटकर यांना सांगितले होते. ५० हजार रु पये डिपॉझिट आणि दरमहा ७ हजार रु पये भाडे या बोलीवर त्याला फ्लॅट देण्यात आला. मुलांना धार्मिक शिक्षण देण्याचे काम करीत असल्याचे त्याने सोसायटीतील रहिवाशांना सांगितले होते. रिझवान, त्याची पत्नी व मुले सोसायटीत कोणाशी जास्त बोलत नसत. रिझवानचा स्वभाव शांत असून त्याचे कोणाशी बोलणेच नसल्याने त्याचे कुणाशी भांडणही नव्हते. मात्र, त्यांच्याकडे कोणती मुले शिकवणीसाठी येत होती, याची माहिती कोणालाच नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. रिझवानच्या घराला कुलूप असल्याने त्याच्या घरातून पोलिसांना काय सापडले, याचा तपशील कळू शकला नाही. त्याचे कुटुंबीय कुठे आहेत, याचाही शोध लागू शकला नाही. स्थानिक बाजारपेठ पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. घर भाड्याने देताना घरमालकाने भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिसांना कळवणे आवश्यक असल्याचे वारंवार पोलीस सांगतात. मात्र, रिझवानला फ्लॅट भाड्याने देणारे घरमालक भाटकर यांनी त्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना दिली नव्हती, अशी माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे आता भाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करायचा किंवा कसे, या दृष्टीने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोण हा रिझवान खान?
By admin | Published: July 24, 2016 3:31 AM