ठाणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबीयांना दुभत्या गायी, म्हशी व शेळ्या, मेंढ्यांचे कळप वाटप केले जाणार आहेत. मात्र, त्यासाठी पात्र उमेदवार मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषद त्यांचा खास शोध घेत आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच पंचायत समितीस्तरावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सतर्क केले आहे. जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढवण्यासह या मागास प्रवर्गातील कुटुंबीयांना आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी या गायी, म्हशी व शेळ्या, मेंढ्यांचे वाटप करण्यात येते. यासाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यास दोन गायी, म्हशी व त्यांचा विमा काढून दिला जाणार आहे. त्या खरेदीसाठी जिल्हा परिषद ७५ टक्के रक्कम खर्च करणार आहे. उर्वरित २५ टक्के लाभार्थ्यास भरावे लागणार आहेत. याशिवाय, शेळ्या-मेंढ्यावाटपामध्ये १० शेळ्या व एक बोकड असा ११ जनावरांचा एक कळप याप्रमाणे लाभार्थ्यांना शेळ्या, मेंढ्याचे कळप वाटप केले जाणार आहे. यासाठीदेखील शासनाकडून ७५ टक्के अर्थसाहाय्य केले जाणार आहे. याशिवाय, या जनावरांसाठी खाद्यपुरवठा व विमा उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी संबंधितांनी पंचायत समितीतील पशुधन अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना किंवा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. कांबळे यांनी केले आहे.
कुणाला हव्यात का गायी-म्हशी?
By admin | Published: April 24, 2016 2:09 AM