भिवंडी - भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे शहरालगतच्या कामवारी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने नदीनाका येथील नदीपात्रात तिघे मित्र पोहण्यासाठी गेले होते. यातील एक मित्र बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी दोघे मित्र गेले होते. बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यात यश आले मात्र वाचवणारा मित्रच बुडून मृत झाल्याची घटना नदीनाका, टिळक घाट येथे घडली आहे. बुधवारी दुपारी इदगाह रोडच्या खाडी किनारी अग्निशमन दल जवानांना मृत इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
शफीक मोहम्मद युसूफ शेख (45 रा.गफूर बस्ती,म्हाडा कॉलनी ) असे पुराच्या पाण्यात बुडून मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. तो जावेद शेख व अन्य एक मित्र असे तिघेजण नदीनाका येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोहत असताना जावेद बुडू लागला त्यामुळे शफीक व त्याच्या मित्राने त्याला वाहत्या पाण्यातून कसेबसे बाहेर काढले, मात्र यावेळी पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने शफीक हा नदीच्या पाण्यात वाहून गेला. या घटनेची माहिती निजामपूर पोलिस व अग्निशमन दलास मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवून बुडीत शफीक शेख याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र अंधार पडल्याने शोध थांबवण्यात येऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी बुधवारी सकाळपासून शोधकार्य सुरु केले असता दुपारी मृतदेह आढळून आला. निजामपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासनमान्य ऑरेंज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून निजामपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.