ठाणे : राज्यातील बहुतेक महापालिकांच्या महापौरांची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. त्यानुसार, ठाण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने पुढील सव्वादोन वर्षे या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाची पसंती ही सभागृह नेते नरेश म्हस्के यांना असली तरी आता खुल्या प्रवर्गासाठी सोडत असल्याने अनेकांनी आतापासूनच दावा ठोकण्यास सुरुवात केली आहे.ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यानुसार, २०१७ मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर महिलेसाठी आरक्षण पडले होते. त्यावेळेस निष्ठावान शिवसैनिकाला न्याय देऊन घोडबंदरपट्ट्याला प्रथमच महापौरपदाचा मान दिल्याने मीनाक्षी शिंदे या महापौर झाल्या होत्या. आता त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून नव्याने आरक्षण सोडतही बुधवारी जाहीर झाली. त्यानुसार ठाण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. त्यामुळे आता अनेकांनी महापौरपद मिळविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये राष्टÑवादीतून शिवसेनेत आलेले देवराम भोईर यांच्या कुटुंबामधील स्वत: देवराम भोईर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना पक्षात घेतानाच ही कमिटमेंट दिली होती. मात्र, आता संजय भोईर यांना स्थायी समिती दिल्याने देवराम भोईर यांचे नाव या यादीतून बाहेर फेकले गेल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. - संबंधित वृत्त/३>आमदार, खासदारांच्या सौभाग्यवती स्पर्धेतदुसरीकडे खुल्या प्रवर्गासाठी सोडत असल्याने मागील वेळेस रेसमध्ये असलेल्या काही महिलांची नावेसुद्धा आता यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहेत. यामध्ये खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक यांची नावेही आघाडीवर आली आहेत. दुसरीकडे कळव्यातून अनिता गौरी यांचेही नाव पुढे आले आहे. परंतु, यामुळे घराणेशाहीची टीका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महापौर कोण होणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.>नरेश म्हस्के राहणार प्रमुख दावेदारएक निष्ठावान शिवसैनिक म्हणूनही आता सभागृह नेते नरेश म्हस्के यांचे नाव या यादीत आले असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना आमदारकीचे तिकीट दिले जाणार होते. तसेच २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आले होते.असे असतानाही त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही. त्यामुळे त्यांना बक्षिसी म्हणून महापौरपद दिले जाण्याची दाट शक्यता असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. महासभा, स्थायी समिती, सभागृह नेतेपद अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी यापूर्वी भूषविली आहेत.शिवाय, विरोधकांचे आव्हान मोडीत काढण्याचे कामही त्यांनी वारंवार महासभेत केले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत डावलले गेल्यानंतर त्यांना महापौरपदाचे आश्वासनही श्रेष्ठींनी दिले असल्याची माहिती आता समोर आली आहे.त्यामुळे श्रेष्ठी त्यांच्यावर विश्वास टाकतील, असे चित्र आहे. एकूणच म्हस्के यांना आश्वासन दिले असले, तरी खुल्या प्रवर्गासाठी सोडत निघाल्याने अनेकांच्या आशा मात्र पल्लवित झाल्या असून त्यांनी आता स्पर्धा निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे.
कोण होणार ठाण्याचा महापौर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 2:27 AM