हितेन नाईक / अनिरुद्ध पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर / बोर्डी : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत कोविडबाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांच्या सहभागाला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने विरोध केला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लहान बालके, गरोदर मातांना संसर्गाची बाधा झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न कृती समितीने उपस्थित केला आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत राज्यात सध्या कोविडबाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ‘रेस ट्रॅक ट्रॅक’ या त्रिसूत्रीचा वापर करून कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.राज्यात कोविड-१९ आजाराने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येतआहेत. राज्याच्या अनलॉक मार्गदर्शक सूचनांनुसार हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून सामान्य जनतेमध्ये या आजाराची भीती कमी होत आहे.अनलॉक सुरू असताना राज्यातील सर्व लोकांना दोन वेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयित रुग्ण शोधून तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्त्वाच्या व्यक्ती शोधून काढणे असा उपक्रम या मोहिमेअंतर्गत १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार असून शहरे, गावे, वाडी, पाडे इत्यादीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे. गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी व दोन स्वयंसेवक असे तिघांचे पथक नेमण्यात आले असून एका पथकाला ५० घरांना भेटी देण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे.या पथकात अंगणवाडी सेविकांचा अंतर्भाव करण्यात येऊ नये, असे पत्र कृती समितीने महिला व बालकल्याण मंत्र्यांना दिले होते. असे असतानाही त्याचा विचार न करता बालकल्याण सचिवांनी अधिकृत परवानगी दिली आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना पोषण आहार वाटप, ग्रोथ मॉनिटरिंग, एसएम या बालकाला व्हीसीडीसीमध्ये दाखल करणे, सॅम बालकांच्या घरी भेट देणे, इत्यादी कामे प्राधान्याने करावयाची असतात.ही कामे करताना सेविकांना लहान बालके, गरोदर महिला, स्तनदा माता या अतिसंवेदनशील लोकांमध्ये मिसळावे लागते. अशा स्थितीत या लोकांना संसर्गाची बाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सचिव राजेश सिंग यांनी उपस्थित केला आहे.अंगणवाडी सेविकांना वगळावे, अन्यथा...आयुक्त कार्यालयाने वेळोवेळी योजनाबाह्य कामे अंगणवाडीला न देण्याबाबत परिपत्रक काढले आहे. युनोने नजीकच्या काळातली पार्श्वभूमी पाहता तीन लाख बालके मृत्युमुखी पडतील, असा कयास व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर अशी गंभीर घटना घडू नये, याकरिता या मोहिमेतून अंगणवाडी सेविकांना वगळावे, अन्यथा २१ सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी नियमित योजनेची कामे सोडून, अन्य कामात सहभागी होणार नाहीत, असा इशारा अंगणवाडी कृती समितीच्या अधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्य सचिव, एकात्मिक बालविकास सेवा योजनांचे आयुक्त आदींना दिला आहे.प्रतिदिन ५० घरांनाभेट देण्याचे टार्गेट‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेंतर्गत प्रत्येक अंगणवाडी सेविकांना प्रतिदिन ५० घरांना भेट देण्याचे टार्गेट आहे. त्यानुसार एका घराचे सर्वेक्षण करण्यासाठी २० मिनिटांचा कालावधी लागत आहे. यासाठी दिवसागणिक सुमारे १७ तास लागतात. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या जबाबदारीव्यतिरिक्त अधिकचे काम प्रत्येक दिवशी करावे लागणार आहे. तथापि, ही जबाबदारी अव्यवहार्य तसेच अशक्य असल्याचे मत अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केले आहे.