सदानंद नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : आयुक्त अच्युत हांगे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने या पदासाठी राजेंद्र निंबाळकर, श्रीधर पाटणकर, विजय म्हसाळ, देविदास पवार यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. या सर्वांनी आयुक्त व उपायुक्तपदी काम केले आहे. शेवटी, सर्वपक्षीय नेत्यांची कुणाला पसंती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे जिल्ह्यात महापालिका आयुक्तपदी आयएएस दर्जाचा अधिकारी द्यावा, अशी मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. त्यानुसार, उल्हासनगरसह इतर महापालिकांना आयएएस दर्जाचे आयुक्त दिले होते. राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती केली. सुरुवातीला शहर विकासाचे स्वप्न दाखवणारे निंबाळकर यांच्यावर आरोप-प्रत्यारोप झाल्याने, त्यांच्या बदलीसाठी अन्य पक्षांसह शिवसेना उभी ठाकली होती. तर, मध्यंतरी तीन महिन्यांसाठी सुधाकर शिंदे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. मात्र, शहर विकास साधण्यात दोन्ही आयुक्तांना अपयश आल्याने पुन्हा आयएएस दर्जाचे नसलेले अच्युत हांगे यांना महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त केले. हांगे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार, याची पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
माजी आयुक्त निंबाळकर, अतिरिक्त आयुक्तपदी काम केलेले पाटणकर, उपायुक्तपदी काम केलेले म्हसाळ व पवार यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. पाटणकर यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन काम केल्याने त्यांची अतिरिक्त आयुक्तपदाची कारकीर्द यशस्वी ठरली होती. महापालिकेवर भाजप-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता आहे. तर, शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाल्याने महापालिकेत भाजप-शिवसेना एकत्र आल्याचे चित्र आहे. त्यांच्या सहमतीनेच नव्या आयुक्तपदाची नियुक्ती केली जाईल, असेही बोलले जात आहे.राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावामहापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका वठवणारी शिवसेना अप्रत्यक्ष सत्ताधारी भाजप-ओमी टीम व साई पक्षासोबत गेल्याचे चित्र आहे. स्थायी व प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुका २१ मे रोजी होणार असून शिवसेनेने सत्ताधारी पक्षाविरोधात उमेदवार उभा केलेला नाही. मात्र, राष्ट्रवादी व रिपाइंने स्थायी समिती सभापती व प्रभाग क्रमांक-४ च्या सभापतीपदासाठी उमेदवार उभा करून विरोधी पक्षाची भूमिका वठवणार आहे.