नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राज्यमंत्री कपिल पाटील असले तरी त्यांच्या विरोधात काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा उमेदवार असणार यावरुन मतदार संघात चर्चा रंगली आहे.
पाटील यांचे कट्टर विरोधक सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भिवंडी हा एकेकाळी काँग्रेसचा गड राहिल्याने काँग्रेस या मतदारसंघाकरिता आग्रही आहे. दयानंद चोरघे व नीलेश सांबरे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असले तरी काँग्रेसने चोरघे यांच्या बाजुने वजन टाकल्याचे वृत्त आहे. सांबरे हे तर अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा करीत आहेत. पाटील यांच्या विरोधात दोन मातब्बर उमेदवार रिंगणात राहिले तर मतविभाजनाचा लाभ पाटील यांना मिळेल.
पाटील यांनी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आ. किसन कथोरे यांची भेट घेऊन त्यांच्या विरोधाची धार बोथट केली आहे. महायुतीमध्ये चार पक्ष असल्याने सर्वच पक्षांची मते पारड्यात पडावीत, याकरिता पाटील यांचे प्रयत्न आहेत. भिवंडी शहर मुस्लीमबहुल मतदारसंघ असल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असावा, असा त्या पक्षाचा आग्रह आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा भिवंडीमार्गे मुंबईत गेली. काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी आपल्या उमेदवारीकरिता जोरदार प्रयत्न केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी दिली तर म्हात्रे उमेदवारी मिळवून मधेच मैदान सोडून देतील अशी भिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. सांबरे अपक्ष लढल्यास म्हात्रे व सांबरे यांच्या मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो.