ठाणे : कल्याण लोकसभेसाठी भाजप शिवसेनेला सहकार्य करणार नसल्याची भुमिका आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आली. परंतु त्यावर आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पलटवार केला आहे. कदाचित कोणाची कल्याण लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा असेल. त्यातून अशी भुमिका पुढे आली असेल. परंतु पक्ष जेव्हा निर्णय घेतो, युती करतो, तेव्हा व्यापक स्वरुपात विचार करत असतो. वयक्तीक विचार करीत नाही. परंतु कोणाची वयक्तीक इच्छा असेल, पण युतीमुळे त्या इच्छेला मुरड घातली जात असेल तर त्यातून असे विचार व्यक्त होतात अशी टिका देखील त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांचे नाव न घेता केली आहे.
काही जण मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु वरीष्ठ पातळीवर युती भरभक्कम आहे. त्यामुळे अशा काही गोष्टींचा परिणाम होणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. तर ठाणे आणि कल्याण लोकसभा शिवसेनेचा लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिव्यात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळेस लावण्यात आलेल्या बॅनरवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे चव्हाण येथील कार्यक्रमालाच हजर राहिले नाही. त्यानंतर लागलीच गुरुवारी कल्याण लोकसभेसाठी भाजपची बैठक झाली. या बैठकीत जो पर्यंत त्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली होत नाही. तोपर्यंत कल्याण लोकसभेत शिवसेनेला सहकार्य करायचे नाही, असा ठराव चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावर आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी तोंडसुख घेतले आहे.
नंदु जोशी याच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यातही त्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करायची किंवा कसे हा गृहखात्याचा विषय असल्याचे सांगत म्हस्के यांनी चव्हाण यांना त्याची आठवण करुन दिल्याचे दिसून आले. तर अशा पध्दतीने जर काही लोकांनी ठराव केला असले तर त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावणकुळे यांची परवानगी घेतली आहे का? असा सवालही त्यांनी केला. परंतु जे काही झाले असेल त्याचा कल्याण लोकसभा उमदेवार श्रीकांत शिंदे, यांच्याशी काहीही संबध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसे असेल तर बंद खोलीत चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात वरीष्ठांशी चर्चा होणे गरजेचे आहे. तेच यावर योग्य तो तोडगा काढतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक पातळीवर काही अतृत्प आत्मा असतात, त्यांच्याकडून अशा गोष्टी होत असतात. परंतु त्याचा परिणाम वरीष्ठ पातळीवर किंवा युतीवर होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे ज्या पध्दतीने लोकसभा आणि विधानसभेसाठी निरिक्षक, संयोजक नेमले आहेत, त्याच पध्दतीने शिवसेना देखील संपर्कप्रमुख, संयोजक, निरिक्षक नेमणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर येत्या १३ तारखेला लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक देखील घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
असे असले तरी देखील बावणकुळे यांनी देखील स्पष्ट केले आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्याठिकाणी देखील भाजपचे निरिक्षक त्यांना मदत करणार आहेत. पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष करीत असतो. परंतु ठाणे आणि कल्याण लोकसभा शिवसेनेचा लढणार आहे. तर भिवंडी हा भाजपकडे असल्याने त्याठिकाणी शिवसेना त्यांना सहकार्य करेल असेही त्यांनी स्पष्ट करीत आगामी निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले.