अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे लोकसभेत यंदा प्रथमच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. उद्धव सेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे तर शिंदे सेनेकडून शिंदे यांचे निष्ठावान माजी महापौर नरेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. ही लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील आहे. ठाण्यातील निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असेल.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे तो शिंदे की ठाकरे यांच्यापैकी कोण सर करणार, हे पाहणे महत्वाचे आहे. विचारे व म्हस्के हे दोघेही स्व. आनंद दिघे यांचे शिष्य असल्याने खरा शिष्य कोण, हेही ठाणेकर नक्की करणार आहे. उद्धव सेनेची साथ सोडून म्हस्के शिंदे यांच्यासोबत गेले. स्वीकृत नगरसेवक, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, महापौर व आता शिंदे सेनेचे प्रवक्ते असा म्हस्के यांचा प्रवास आहे. तर उद्धव सेनेने राजन विचारे यांना सलग तिसऱ्यांदा संधी दिली आहे.
गाजत असलेले मुद्दे
आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण? ठाण्याचा गड कोण राखणार? निष्ठावंत की गद्दार? खासदार लोकांच्या संपर्कात होते का? भाजपमधील नाराजांची भूमिका काय?
नाराजीचा सूर
शिंदे सेनेकडून नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत आणि मीरा-भाईंदरमध्ये नाराजीचा सूर उमटला. गणेश नाईक कुटुंबीयांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठक घ्यावी लागली. त्यानंतर नाराजी दूर झाल्याचे नाईक यांनी जाहीर केले असले तरी दिल्लीतून नेत्यांना ठाण्यात पाठवले जाणार आहे.
नेत्यांची भूमिका महत्त्वाची
भाजपच्या गणेश नाईक यांची भूमिका महत्वाची आहे. नवी मुंबईतून म्हस्के यांना किती मताधिक्य मिळते, त्यावर त्यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे. मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडे अधिक लक्ष देऊन आहेत. विचारे यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे मैदानात उतरल्या आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
ठाण्याला अद्यापही हक्काचे धरण उपलब्ध होऊ शकलेले नाही. मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूककोंडी केव्हा सुटणार. जलवाहतुकीचे भिजत पडलेले घोंगडे. नवीन ठाणे स्टेशनचे काम केव्हा पूर्ण होणार. पाण्याची समस्या आजही सुटू शकलेली नाही.
२०१९ मध्ये काय घडले ?
राजन विचारे शिवसेना (विजयी) ७,४०,९६९आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेस ३,२८,८२४
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?
वर्ष विजयी उमेदवार पक्ष टक्के२०१४ राजन विचारे शिवसेना २८.७२२००९ संजीव नाईक राष्ट्रवादी ४०.१४२००४ प्रकाश परांजपे शिवसेना ४८.०८१९९९ प्रकाश परांजपे शिवसेना ४३.२२१९९८ प्रकाश परांजपे शिवसेना ५९.२१