डोंबिवली : शिवसेना-भाजपाच्या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा राडा, तलवारी-बंदुकीचा वापर करीत झालेली हाणामारी यामुळेच अधिक गाजलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी (केडीएमसी) ४७ टक्के मतदान झाले. मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याआधी अस्मिता पणाला लावलेल्या कोणत्या पक्षाचा झेंडा केडीएमसीवर फडकणार, याचा आज फैसला होणार आहे. भाजपा, शिवसेना, मनसे, आघाडी, रासप, बविआ, एमआयएम, बसप, सपा यांसह अपक्ष अशा एकूण ७५० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंदिस्त झाले. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मतमोजणी होणार आहे. येथील सत्ता काबीज करण्यासाठी राज्यातील शिवसेना व भाजपा या सत्ताधारी पक्षांमध्ये बिग फाइट होत असल्याने या निवडणूक निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. महापालिका हद्दीतील बहुतांशी सर्वच ठिकाणी सकाळपासून मतदारांमधील उत्साह पाहायला मिळाला. ज्येष्ठ नागरिकांसह युवावर्गही दिसत होता. मतदान केल्यावर सेल्फी काढण्यात येत होते. महिलाही मतदानासाठी उतरल्या होत्या. गेल्या वेळीप्रमाणेच याही वेळी ४७ टक्के मतदान झाले.२७ गावांतील मतदानावर विजयाचे गणितशहरी मतदानाप्रमाणेच २७ गावांमधील मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकतात त्यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. येथील ११७ क्र.चा वॉर्ड येणाऱ्या भाल या गावातील सर्वच्या सर्व १६९३ मतदारांनी मतदानावर संपूर्णपणे बहिष्कार घातला. मात्र अन्य गावांमध्ये मतदारांनी रांगा लावून मतदान केले. दोन खासदार, एका आमदाराला नोटीसनिवडणूक आयोगाचा आदेश झुगारून केडीएमसी हद्दीत प्रवेश केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, भाजपाचे खासदार कपिल पाटील व अंबरनाथचे आमदार बालाजी केणीकर यांना आयोगाने नोटीस बजावली आहे. मतदानाच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षाच्या बाहेरील नेत्यांना प्रवेशबंदी केलेली असतानाही ते या परिसरात आढळून आले.तलवारबाजी सुरूचमनसेच्या मंदा पाटील यांचे पती सुभाष पाटील यांनी भाजपाचे कार्यकर्ते नितीन पालन यांच्यावर चाकू व तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली. मनसेने त्याचा इन्कार केला. डोंबिवली सारस्वत कॉलनी परिसरात बाचाबाची झाली. कोल्हापूरमध्ये ६८.८२ टक्के मतदान : सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेली आगपाखड, राजकीय, वैयक्तिक आरोपांच्या झडलेल्या फैरी आणि राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली व्यक्तिगत प्रतिष्ठा यामुळे संपूर्ण राज्यभर गाजलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी रविवारी अपूर्व, अत्यंत चुरशीने सरासरी ६८.८२ टक्के मतदान झाले. - वृत्त/६
झेंडा कुणाचा?
By admin | Published: November 02, 2015 3:22 AM