ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची सभा झाली असून आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मराठीचा मुद्दा, गुजराती-मराठी वाद, त्यानंतर क्लस्टर, रस्ते, वाहतूककोंडी, अरुंद रस्ते, पाणी, जुन्या इमारतींचा प्रश्न या प्रमुख मुद्यांवरून सध्या या मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडाला आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असले तरी खरी लढत ही भाजपचे संजय केळकर आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात होत आहे. अविनाश जाधव यांनी निवडणुकीची आचारसंहिता लागली, तेव्हापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. तर, संजय केळकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली. सुरुवातीला केळकर यांच्या नावाला काहीसा विरोध होता. शिवसेनेतील काही मंडळीदेखील नाराज होती. परंतु, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्याने त्यांची नाराजी दूर झाली आहे. दुसरीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने राष्टÑवादीने आपला उमेदवार मागे घेऊन थेट मनसेला टाळी दिली आहे. त्यामुळे राष्टÑवादीच्या मतांचा फायदा मनसेला मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु, ती किती असतील, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मागील काही दिवसांपासून या दोनही उमेदवारांनी प्रचाररॅली, चौकसभा, बाइकरॅली आदींवर अधिक भर दिल्याचे दिसत आहे. परंतु, आता आॅक्टोबर हीट वाढत असल्याने सकाळच्या प्रचाराऐवजी सायंकाळच्या प्रचारावर अधिकचा भर दिला जात आहे. रॅलीला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारांचे कुठे औक्षण होताना दिसत आहे, तर कुठे समस्यांचा पाढा वाचला जात आहे. नौपाडा भागात जुन्या इमारतींचा प्रश्न, घोडबंदरच्या काही भागात पाण्याची समस्या, कुठे वाहतूककोंडी, तर कुठे रस्त्यांची झालेली दुरवस्था अशा विविध मुद्यांवरून मतदारराजाही या दोन्ही उमेदवारांना आठवण करून देत आहे. तर, शहरातील वाहतूककोंडी दूर करण्याबरोबरच स्टेशन परिसरातील अनधिकृत रिक्षाचालकांची मक्तेदारी मोडून काढण्याचे आश्वासन अविनाश जाधव यांच्याकडून दिले जात आहे.सर्वकाही मतदारांना आकर्षित करण्यासाठीदरम्यान, सकाळीच प्रचाराला सुरुवात होत असून कुठे टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेताना अविनाश जाधव दिसत होते, तर कुठे भाजपचे उमेदवार संजय केळकर हे मॉर्निंग वॉक करून क्रिकेटचा खेळ खेळताना दिसले आहेत. एकूणच, मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता हे दोन प्रमुख उमेदवार वाट्टेल ते करण्याच्या तयारीत आले आहेत. त्यामुळे चाय पे चर्चा म्हणत मतदारांनी मतांचे चौकार, षटकार मारावे, असे तर या दोघांना म्हणायचे नसेल ना, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.