शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
2
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
3
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
4
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
5
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
6
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
7
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह १५ सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
8
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
9
... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात
10
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
11
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर
12
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
13
उद्धव ठाकरे की शरद पवार? महायुतीची द्वारे कोणाला खुली होणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
14
बुमराहनं गमावला 'नंबर वन'चा मुकूट; टेस्टमध्ये त्याच्यापेक्षा बेस्ट ठरला 'हा' गोलंदाज
15
Diwali 2024: इकडे कन्फ्युजनमध्ये राहाल, तिकडे शेअर बाजार चालूच राहिल.., पैसा जाईल; ३१ ऑक्टोबरचं काय?
16
राज ठाकरेंनी आपल्या मुलासाठी माहिम मतदारसंघच का निवडला? काय आहे तयारी? स्वतःच सांगितलं
17
सोलापुरात सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; कोणत्या मतदारसंघात कोण लढणार?
18
माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका
19
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
20
मारुती सुझुकी स्वत:साठीच नाही तर दुसऱ्या कंपनीलाही इलेक्ट्रिक कार बनवून देणार; केव्हा करणार लाँच

ठाणे कोणाचे..? शिंदेंच्या शिवसेनेचे की भाजपचे..? भाजपच्या ठाण्यातील नेत्यांची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:18 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोडदौड ज्या वेगाने सुरू आहे, ती पाहून भाजपच्या ठाण्यातील नेत्यांची झोप उडाली आहे.

- अतुल कुलकर्णी,  संपादक, मुंबई राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे. ज्या ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात, त्या ठाण्यात मात्र भाजप नेत्यांमध्ये टोकाची अस्वस्थता आहे. ज्या वेगाने शिंदे यांचा घोडा दौडत आहे, तो वेग पाहून भाजपच्या ठाण्यातील नेत्यांची झोप उडाली आहे. ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र असताना शिवसेनेचे ६७ नगरसेवक होते. त्यापैकी ६४ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. खा. राजन विचारे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे. त्यांचे स्वतःचे दोन-तीन लाख मतांचे फिक्स डिपॉझिट आहे. त्यामुळे त्यांना शिंदे गटासोबत जावे वाटत नाही. ठाण्यात काँग्रेसचे ३ तर राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक होते. बदलत्या काळानुरुप राष्ट्रवादीचे नगरसेवक जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत राहणार की वेगळीच चूल मांडणार हे निवडणुका जवळ आल्यावरच स्पष्ट होईल. तोपर्यंत तरी ते सगळ्यांनाच आम्ही तुमचेच, असे सांगत असतील तर नवल नाही.

भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे कल्याण डोंबिवलीत दौरे वाढले आहेत. कल्याण हा डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ. श्रीकांत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र. त्यामुळे तिथेच भाजपच्या वाढलेल्या चकरा अनेकांना चक्रावून टाकणाऱ्या आहेत. कल्याण डोंबिवली हा सुरुवातीपासून भाजपचा गड. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांनी तेथे नेतृत्व केले. आता भाजपकडे मंत्री रवींद्र चव्हाण, विनय सहस्त्रबुद्धे आणि आ. संजय केळकर यांची नावे आहेत. हा मतदारसंघ भाजपला द्यावा आणि राजन विचारे यांनी ठाकरेंना सोडले नसल्यामुळे त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी विचारेंच्या विरोधात लोकसभा लढवण्याचा विचार करावा, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. अनुराग ठाकूर यांच्यासोबत हीच चर्चा सातत्याने झाली आहे. 

या दौऱ्यात भाजपने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडियात आपण कुठे आहोत, फॅमिली व्हाॅट्स ॲप ग्रुपवर भाजपचा एक तरी पदाधिकारी आहे का, बुथ मॅनेजमेंट कशी आहे, याची विचारणा अशा दौऱ्यातून पदाधिकाऱ्यांना केली जात आहे. यासोबतच ‘एबीसी मार्किंग’ हा भाजपचा महत्त्वाचा विषय आहे. जे मतदार भाजपसोबत आहेत ते ‘ए’ कॅटेगिरीमध्ये, जे भाजपसोबत आहेत पण नाराज आहेत ते ‘बी’ कॅटेगिरीमध्ये आणि जे भाजपाच्या विरोधात आहेत ते ‘सी’ कॅटेगिरीमध्ये अशी विभागणी करण्यात आली आहे. ‘सी’ गटातल्या लोकांना भाजपकडे वळवणे, ‘बी’ गटातल्या लोकांची नाराजी दूर करणे यावरही भर दिला जात आहे. पर्सनल रिलेशनच्या माध्यमातून लोकांना कसे जोडायचे यावरही अत्यंत बारकाईने केवळ कल्याण डोंबिवलीत नव्हे तर सर्व लोकसभा मतदारसंघात काम सुरू आहे. इतके बारकाईने नियोजन चालू असताना कोणत्याही परिस्थितीत कल्याण  लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहील, हा आग्रह एकनाथ शिंदे यांना मोडता येणार नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे अशी लढत झाली तर आश्चर्य वाटू नये. 

भाजपने ठाण्यात सर्व्हे केला. त्यानुसार ठाणे महापालिकेत भाजप एकटा लढला तर त्यांना ५३ जागा मिळतील. मावळत्या महापालिकेत भाजपचे २३ नगरसेवक होते. शिंदे गटासोबत निवडणूक लढवली तर भाजपचे ३० नगरसेवक निवडून येतील असे भाजपचा सर्व्हे सांगतो. त्यामुळे आपण वेगवेगळे लढू आणि निकालानंतर एकत्र येऊ असा भाजपचा प्रस्ताव आहे; मात्र एकनाथ शिंदे यांना ठाणे महानगरपालिका एकत्र लढावी, असे वाटते. जर भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र लढली नाही आणि भाजपचे नगरसेवक संख्येने जास्त निवडून आले, तर भाजप महापौरपदावर दावा करेल. आपण मुख्यमंत्री असताना आपल्या होम पिचवर भाजपचा महापौर ही कल्पना शिंदे यांना पटत नाही. जर शिंदे-भाजप युती झाली तर भाजपची मते शिंदे गटाला मिळतील; पण शिंदे गटाची मते भाजपला मिळणार नाहीत. ती ठाकरे गटाला मिळतील, असा तर्क भाजपकडून मांडला जात आहे; मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप ठाण्यात एकत्र येणार का? यावर महाराष्ट्राच्या विधानसभेचे चित्रही अवलंबून असेल, असेही भाजप नेत्यांना वाटते.

मुंबई महापालिकेमध्ये आम्हाला निवडणूक कठीण आहे, असे शिंदे गटाचे नेते खासगीत सांगतात. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात, वरळीत शिंदे यांची सभा झाली. त्याची जबाबदारी किरण पावसकर यांनी घेतली होती; मात्र सभेचे पूर्ण खोबरे झाले. ती सभा नसती घेतली तर बरे झाले असते असे शिंदे गटाचे नेते सांगतात. अशा परिस्थितीत मुंबई महापालिका निवडणूक शिंदे गटासाठी म्हणावी तेवढी सोपी नाही. 

ठाण्यातही भाजपने वेगळे लढण्याचा विचार पुढे केला तर महापौरपद भाजपला मिळणार की शिंदे गटाला हे निकालापर्यंत अधांतरी राहील. अशा परिस्थितीत ‘ठाणे कुणाचे... शिंदेंच्या शिवसेनेचे की भाजपचे?’ या निर्णयावर राज्यातली अनेक राजकीय गणितं मांडली आणि मोडली जातील...

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे