सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत एससी, एसटी व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ३१ मे रोजी टाऊन हॉल मध्ये सोडत काढण्यात येत आहे. कोणाचा प्रभाग महिला आरक्षित होणार, या चिंतेने अनेक दिग्गजांचे जीव टांगणीला लागले आहे.
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूका केंव्हाही जाहीर होणार असून त्याची प्रक्रिया म्हणून ३१ मे रोजी महिला सर्वसाधारण, एससी महिला व एसटी महिलांचे आरक्षण सोडत काढण्यात येत आले. महापालिकेत एकून ३० प्रभाग असणार आहे. त्यापैकी २९ प्रभाग त्रिसदस्यीय तर एक प्रभाग द्विसदस्यीय आहे. ३० प्रभागातून एकून ८९ नगरसेवक निवडून येणार आहेत. गेल्या निवडणुकीत २० प्रभागातून एकून ७८ नगरसेवक निवडून आले होते. मात्र यावर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात ११ नगरसेवक वाढल्याने एकून ८९ नगरसेवक निवडून येणार आहेत. यामध्ये ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने, महिला नगरसेवकांची टक्केवारी ५० टक्के जास्त राहणार आहे. ८९ पैकी १५ एसी तर १ एसटी साठी आरक्षित आहेत.
महिला आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्ष नेत्यांसह इच्छुकांचे लक्ष लागले असून आपला प्रभाग महिला आरक्षित होऊ नये. यासाठी अनेकजण पाण्यात देव घालून बसले आहेत. महिला आरक्षित प्रभागामुळे अनेक इच्छुकांचे पत्ते साफ होणार आहे. तर त्यांच्या पत्नी, मुले व नातेवाईकांचा मार्ग मोकळा होणार आहे. अनेक महिला फक्त नावालाच नगरसेविका राहिल्या असून सर्व कामकाज त्यांचा नवरोबाच नवरा बघतो. हे कमी म्हणून की काय अनेक पत्रावर नगरसेविका पत्नीच्या ऐवजी पतीच सही मारत असल्याचे चित्र गेल्या महापालिकेत होते. असे चित्र बदलून सक्षम महिला नगरसेविका पदी निवडून याव्या. अशी नागरिकांची मागणी आहे.