संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक
मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यात गेली आठ ते पंधरा दिवसांत घडलेल्या दोन घटना अत्यंत धक्कादायक आहेत. यातील एक घटना ठाणे शहरातील राबोडीतील आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून तब्बल १७ तरुणी व महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली.
दुसरी घटना ही ग्रामीण भागातील आहे. मुरबाड तालुक्यातील करवळे या गावातील वयोवृद्ध नागरिक लक्ष्मण भावार्थे यांना मध्यरात्री घरातून उचलून नेले व जादूटोणा करीत असल्याच्या संशयामुळे विस्तवावरून चालण्यास भाग पाडले. महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा केल्याने आपण चमत्कार करतो, असा दावा करायला बुवा, बाबा धजावत नाहीत. परंतु, लोकांच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण करण्याच्या घटना कमी झालेल्या नाहीत. कायदा करून प्रश्न सुटत नाहीत. कायद्याला जनजागृतीची जोड द्यावी लागते.
राबोडीतील घटना अत्यंत धक्कादायक आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक, हत्या केल्याच्या असंख्य घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, तरीही आर्थिक विपन्नतेचा सामना करणाऱ्यांचा अशा भूलथापांवर विश्वास बसतो हेच दुर्दैवी आहे. पाच-सहा जणांच्या टोळीने महिला, मुली यांना हेरून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. पैशांचा पाऊस पडेल तेव्हा विवस्त्र असले पाहिजे, असे या अनोळखी पुरुषांनी सांगितल्यावरही आपली फसवणूक होत आहे, आपली अब्रू लुटण्याचे हे कारस्थान आहे हे विशी-चाळिशीच्या मुली, महिलांच्या लक्षात येत नसेल तर पैशांची हाव किती पराकोटीची आहे व अंधश्रद्धेचा पगडा किती खोलवर आहे, याचा अंदाज येऊ शकतो. एक मुलगी बेपत्ता झाल्याच्या तक्रारीमुळे हे प्रकरण उजेडात आले. १७ जणींना या टोळीने लक्ष्य केले आहे. कदाचित संख्या जास्त असू शकते. मुरबाडमधील घटनेत कोण कुठला आसनगावचा देवा म्हसकर नावाचा मांत्रिक वृद्ध लक्ष्मण भावार्थे हे जादूटोणा करतात, असे सांगतो आणि संपूर्ण गाव त्यांच्या जिवावर उठते हेही भयंकर आहे.
जादूटोणाविरोधी कायदा झाल्यापासून आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त गुन्हे राज्यात दाखल झाले. काही गुन्ह्यांत सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली. मात्र, जोपर्यंत सरकार जगजागृती करीत नाही आणि पोलिस कठोर कारवाई करीत नाही, तोपर्यंत असे प्रकार घडत राहणार. अंधश्रद्धांच्या बाबतीत शहरी व ग्रामीण भाग यामध्ये फारसा फरक नाही, हेही राबोडी व मुरबाडमधील घटनांमुळे स्पष्ट झाले. शहरातील अनेक सुशिक्षित मंडळी वास्तुशास्त्राच्या नावे अंधश्रद्धा जोपासतात व आपल्या या अंधश्रद्धांना इंटेरियर डेकोरेशनचा मुलामा देतात. ग्रामीण भागात आजही जादूटोणा, डाकीण, मांत्रिक वगैरे गोष्टींचा पगडा आहे.
गावामधील भावकीतील वाद, जमिनीचे, वहिवाटीचे संघर्ष यातूनही विरोधकाला धडा शिकविण्याकरिता अंधश्रद्धांचा आधार घेतला जातो. राज्यातील जनतेने अंधश्रद्धांच्या आहारी जाऊ नये, असे वाटत असेल तर राजकीय नेतृत्वाने आपल्या कृतीतून तसा संदेश द्यायला हवा. मात्र, गेल्या दोन-चार वर्षांत राजकीय नेते इतके अस्थिर झाले आहेत की, त्यांनाच बुवा, बाबा, गंडे-दोरे यांची प्रकर्षाने गरज वाटू लागली आहे. अंधश्रद्धांना विरोध करणाऱ्या पुरोगामी कार्यकर्त्यांना धर्मविरोधी ठरवून लक्ष्य केले जाते. पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली घालणाऱ्या या घटना आहेत.