ठाणे : घोडबंदरवरील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या विरोधात सोमवारी ठाणे शहर मनसेच्या वतीने घोडबंदर भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरुपाच्या घोषणा देत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेने केल्याचे दिसून आले.ठाण्यात विविध प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. माजिवडा, कापुरबावडी, मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा घोडबंदरचा रस्ता असेल, या सर्वच रस्त्यांवर सध्या खड्डेच खड्डे असे चित्र आहे. त्यात घोडबंदर मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. तसेच कोणत्याही स्वरुपाचे नियोजन न करता येथील रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटचे काम ऐन पावसाळ्यात सुरु झाले आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी आणि रस्त्यांना पडलेल्या भल्या मोठ्या खड्यांमुळे वाहन चालकांचे हाल सुरु झाले आहेत. तीनच दिवसापूर्वी घोडबंदर रस्त्याची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबधींत प्राधिकरणाच्या अधिकाºयांबरोबर पाहणी केली होती. त्यानंतर तत्काळ रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे आदेशही दिले होते. परंतु आता याच खड्यांच्या विरोधात मनसे आता रस्त्यावर उतरली आहे. सोमवारी सांयकाळी मनसेचे शहर प्रमुख रविंद्र मोरे यांनी आपल्या समर्थकांसह येथील वेदांत हॉस्पीटल समोरील रस्त्यावर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते याच खड्यात बसले होते. यावेळी पदाधिकाºयांनी कशाला गाताय विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे, आयुक्त हाय हाय अशा घोषणाबाजी देत हे आंदोलन केले.घोडबंदर भागात रस्त्यांना खड्डे पडले असतांना आयुक्त एसीत बसले आहेत. याच खड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, दुचाकीस्वार पडत आहेत, त्याला जबाबदार कोण, यावर तत्काळ उपाय करण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी मोरे यांनी दिला.