लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेशी ज्या वाहनात चकमक झडली त्याच मोठ्या वाहनाची निवड त्याला नेण्यासाठी कोणत्या कारणास्तव केली गेली, असा सवाल गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकाऱ्यांनी ठाणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाला केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आरोपी अक्षयचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. याप्रकरणी पुणे सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक सारंग आव्हाड आणि नवी मुंबईच्या कोकण भवन येथील सीआयडीचे अधीक्षक राहुल वाघुंडे ठाणे पोलिसांकडे चौकशी करीत आहेत.
आरोपी एकच असूनही त्याला वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे आणि सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्यासह चारही पोलिस नियंत्रणात का आणू शकले नाहीत? मोठ्या वाहनाची गरज होती का? अशी विचारणा एका पत्राद्वारे सीआयडी अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती एका वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्याने दिली.
सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या वाहनाचा वापर
बदलापुरात मोठे जनआंदोलन झाले होते. त्यामुळे आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता तसेच संवेदनशील प्रकरण असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या वाहनाची निवड करावी, लागल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत दिली.