कल्याण : रेल्वेस्थानकाकडे जाणाºया पश्चिमेकडील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण होऊनही अतिक्रमण कायम आहे. एकीकडे फेरीवाल्यांनी रस्ते बळकावले असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील पदपथांवर व्यापाºयांनी आपले जादा सामान थाटले आहे. त्यामुळे चालायचे कुठून आणि कसे, असा प्रश्न पादचारी विचारत आहेत.
केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी १६ रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती. मात्र, केवळ कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याचे रुंदीकरण झाले. या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु, सध्या फेरीवाल्यांनी या रस्त्यावर पुन्हा ठाण मांडले आहे. तर, व्यापाºयांनी पदपथावर आपले सामान ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाने काय साधले, असा सवाल उपस्थित होत आहे. रस्ता रुंदीकरणाचा फटका व्यापाºयांना बसला खरा, पण पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या नावाखाली त्यांनी वाढीव बांधकामे केली. त्यात निवासी वापरासाठी असलेल्या इमारतींचा वापर व्यावसायिक कारणांसाठी सुरू झाला. महापालिकेच्या कृपाशीर्वादामुळे या रुंदीकरणात व्यापाºयांचे चांगभले झाल्याचेही पाहावयास मिळाले.
रस्ता रुंद करताना तेथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली होती. परंतु, रुंदीकरणानंतरची परिस्थिती पाहता फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. त्याचबरोबर व्यापाºयांनीही पदपथ व्यापल्याने रस्ता रुंदीकरणाचे फलित शून्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हेच चित्र डोंबिवलीतही आहे. पूर्वेतील उर्सेकरवाडी, केळकर रोड आणि पश्चिमेकडील गुप्ते रोड, दीनदयाळ मार्ग पाहता याची प्रचीती येते. उर्सेकरवाडीत फेरीवाला अतिक्रमणविरोधी कारवाई काही प्रमाणात दिसत असली तरी येथील पदपथ व्यापाºयांना आंदण दिले आहेत. हा दुजाभाव का, असा सवाल केला जात असून यावरून फेरीवाले आणि पथक यांच्यात वादाचे प्रकारही घडले आहेत.शोभेची पथके नकोत, ठोस कारवाई हवीबेकायदा व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी केडीएमसीने नुकतीच प्रभागनिहाय ‘विशेष फेरीवाला पथक’ स्थापन केले आहे. हे पथक महापालिका कार्यालयीन वेळेनंतर रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहे.बेकायदा विक्री करणारे फेरीवाले, हातगाडीवाले यांच्याविरोधात ही विशेष कारवाईची मोहीम उघडण्यात आली असली तरी व्यापाºयांच्या अतिक्रमणाकडे झालेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.अतिक्रमण कायम राहिल्यास अधिकारी आणि पथकातील कर्मचारी कारवाईस पात्र ठरतील, असेही आयुक्त बोडके यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. मग, वस्तुस्थिती पाहता व्यापाºयांच्या अतिक्रमणाप्रकरणी कारवाईचा बडगा संबंधितांवर उगारला जाईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.