लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रभाग अधिकाऱ्यांच्या बाबतीत वारंवार घडणाऱ्या लाचखोरीच्या घटना पाहता या पदाचा कार्यभार सहायक आयुक्त दर्जाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी केली आहे. लाचेची मागणी करून बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या उपायुक्तांवर शासन नियमानुसार फौजदारी कारवाई का होत नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे. यासंदर्भात आयुक्त पी. वेलरासू यांना पत्र पाठवून शासन नियमाची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.महापालिकेच्या ‘जे’ प्रभागाच्या अधिकारी स्वाती गरूड यांना शनिवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजारांची लाच घेताना अटक केली. सध्या त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र, या घटनेतून केडीएमसीत भ्रष्टाचार सुरूच असल्याचे पुन्हा समोर आले आहे. वास्तविकपणे प्रभाग अधिकारी पदावर सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतांश प्रभाग समित्यांवर दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यातूनच लाचखोरीची प्रकरणे घडत असल्याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे. भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे केडीएमसीची पुरती बदनामी झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. बेकायदा बांधकामाला दिले अभयघरदुरुस्तीच्या प्रकरणातच लाच घेतल्याने गरूड यांना अटक झाल्याने त्यांनी बेकायदा बांधकामाला अभय देण्यासाठी पैसे मागितल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३९७ नुसार अशा व्यक्तीवर आणि त्याच्यावर नियंत्रण असणाऱ्या अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई प्रस्तावित आहे. परंतु, याची कठोरपणे अंमलबजावणी केडीएमसीत आजवर झालेली नसल्याचे हळबे यांचे म्हणणे आहे. अशा कारवाईची अंमलबजावणी झाल्याशिवाय महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.कारवाई संदर्भात महासभेत एकमताने ठराव देखील पारीत झाल्याचे हळबे यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे. लाचखोरीची शृंखला : उपायुक्त सु.रा. पवार, कार्यकारी अभियंता सुनील जोशी, प्रभाग अधिकारी गणेश बोराडे, सुहास गुप्ते यांना यापूर्वी लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाली आहे. त्यानंतर प्रभाग क्षेत्र अधिकारी आता स्वाती गरूड यांनाही लाच घेताना पकडले आहे.
‘त्यांच्या’वर फौजदारी का नाही?
By admin | Published: July 04, 2017 6:37 AM