ठाणे : महिलांवर अन्याय होत असेल, तर त्या इतकी वर्षे गप्प का बसतात? हाडाचे पत्रकार आपला आवाज जनतेपर्यंत पोहोचवतात, मग तेच का गप्प बसले आहेत? मला भीती वाटत होती, हे मला पटत नाही. मेहनतीने काम करताना संयम ठेवावा. अन्याय झाला असेल तर त्या महिलांनी आठ ते १० वर्षे गप्प बसायला नको होते, अशी नाराजी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी मी-टू प्रकरणाबाबत व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा केंद्र आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे नॉर्थ यांच्यातर्फे मंगळवारी सहयोग मंदिर येथे ‘विचारकुंकू या कार्यक्रमात कुबल यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी घेतली. त्या म्हणाल्या की, तलवारीची धार आता बोथट झाली आहे. तुमचा कोणी हात धरला तर तो झटकू शकता किंवा वाजवू शकता. आवाज उठवा व स्वत: ठाम नकार द्या, असा सल्ला देत घटना घडताना आपण बघ्याची भूमिका घेतो, याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल, तर अन्याय करणाऱ्याला ठेचून काढावे, असे त्या म्हणाल्या. अभिनय क्षेत्रात मेहनतीबरोबर नशीबही लागते. खरा टीकाकार आपल्याकडे हवा असतो, कारण त्याने आपल्या कामात सुधारणा होते. निवेदिता सराफ, किशोरी शहाणे, प्रिया बेर्डे,अर्चना जोगळेकर, वर्षा उसगावकर आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत. काम करताना आम्ही कधीच व्यावसायिक नाते ठेवले नव्हते. त्यावेळी जिव्हाळ्याचे नाते असे. आता फक्त व्यावसायिकपणा आला आहे. हल्लीच्या अभिनेत्री फक्त कामापुरते बोलतात. समोर ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेते/अभिनेत्री बसले आहेत, याचे त्यांना भान नसते. एकमेकांमधला संवाद संपला आहे. अॅटॅचमेंट नसल्यामुळे कौटुंबिक नाते आता राहिलेले नाही. कास्टिंग काऊचबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी अन्याय होत असेल तिथे बोलावे, असा कानमंत्र दिला.
अध्यक्षस्थानी महापौर मीनाक्षी शिंदे होत्या. दरम्यान, हिंदी साहित्यिका सुलभा कोरे, सामाजिक क्षेत्रातील वृषाली मगदूम, पत्रकार अनुपमा गुंडे, घरकाम करणाºया शोभा बांदेकर आणि सहकार क्षेत्रातील शिल्पा शिनगारे यांचा सत्कार करण्यात आला. ठाणे केंद्राचे सचिव अमोल नाले यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानची उद्दिष्टे सांगितली. आभारप्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘लक्ष्मीकांत बेर्डे माणूस म्हणून चांगला’ : सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा देताना त्या भावुक झाल्या. लक्ष्याचा कोणताही सिनेमा मी आवर्जून पाहते. लक्ष्या आपल्याला सोडून गेला, याचे वाईट वाटत आहे. माणूस म्हणून तो नेहमीच चांगला होता, असे भावोद्गार त्यांनी काढले.