लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात सोन्याचे महत्त्व असलेल्या जमिनीचा लेखाजोखा सांभाळणारे अवघे २०५ तलाठी सक्रिय आहेत. या तलाठ्याच्या हाताखाली या जमिनीच्या कामासाठी दारोदारी फिरून कर्तव्य बजावणारे फक्त १८३ कोतवाल आहेत. त्यापैकीही फक्त ११९ पदे जिल्ह्यात सक्रिय आहेत. पायपीट करणाऱ्या या कोतवालांना वर्षाकाठी चप्पल खरेदीसाठी अवघे दहा रुपये भत्ता मिळत आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यापैकी १२ कोतवालांची पदोन्नती करून त्यांची शिपाईपदी नियुक्त केली.
देशातील सर्वाधिक सहा महापालिका आहेत. गावपाड्यांचे झपाट्याने नागरीकरण होऊन महानगरांत उद्योग, कारखान्यांची वाढ होत आहे. यामुळे महसूल विभागाच्या नियंत्रणाखाली जमिनीला सोन्याचे महत्त्व आले आहे. या जमिनीच्या व्यवहाराची नोंद ठेवून सांभाळ करणारे जिल्ह्याभरात चार उपविभागीय अधिकारी, ३८ मंडल अधिकारी व तब्बल २०५ तलाठी कार्यरत आहेत. या तलाठ्यांसोबत जिल्ह्यात १८३ कोतवालांची पदे मंजूर आहेत. पण त्यातील आजपर्यंत ११९ कोतवालांवर या महत्त्वाच्या कामांच्या गाडा ओढला जात आहे. सुमारे ६४ कोतवाल पदे जिल्ह्याभरात रिक्त आहेत.
ठाणे उपविभागीय कार्यक्षेत्रामध्ये ठाण्यासह मीरा-भाईंदर समाविष्ट आहे. याशिवाय भिवंडीत व शहापूर तालुक्याचा समावेश आहे. तर कल्याण उपविभागीय कार्यालयांतर्गत मुरबाड आणि कल्याण तालुका आहे. उल्हासनगर उपविभागीय कार्यालयाच्या नियंत्रणात अंबरनाथ आणि उल्हासनगर तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये मंडल अधिकारी व त्यांच्या नियंत्रणातील २०५ तलाठी सध्या जिल्हाभर कार्यरत आहेत. या तलाठी पदाच्या हाताखाली काम करणारे ११९ काेतवाल आहेत. यांनाही महिन्यांसाठी फक्त पाच हजारांचे मानधन असल्याचे वास्तव समोर आले आहे.
१) कोतवालांच्या कामांची यादी -
तलाठी कार्यालयातील हे कोतवाल शिपाईपदाचे कामासह परिसरातील आपत्तीसह अन्य घडामोडींवर लक्ष ठेवणे. त्याची माहिती तलाठ्यांना देणे. ज्यांच्या नावे नोटीस आहे, ती त्यांच्या घरी पोहोच करणे. परिसरात सतत फिरून ठिकठिकाणच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करणे.
२) राज्यातील अन्य जिल्ह्यांत २०११ पासून कोतवाल पदांची पदोन्नती झालेली नसल्याचे ऐकायला मिळाले. मात्र, ठाणे जिल्ह्यात दोन ते तीन महिन्यांपूर्वी १२ जणांची पदोन्नती होऊन ते शिपाई झाले आहेत. उर्वरितांच्या पदोन्नतीच्या दृष्टीने माहिती घेतली जात आहे.
--------
३) प्रतिक्रिया -
राज्यात प्रथमच जिल्हाधिकारी महोदयांनी ठाणे जिल्ह्यातील कोतवाल पदांचे प्रमोशन काही महिन्यांपूर्वी केले आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी जिल्हाधिकारी महोदयांच्या सत्कारही केला आहे. कोतवाल हे पद मानधनावर आहे. तलाठ्यांच्या हाताखाली ते काम करतात. कार्यक्षेत्रातील गावात घरोघरी पत्रव्यवहार पोहोच करण्याचे कोतवालांचे काम आहे.
- राजेंद्र चव्हाण, तहसीलदार, महसूल, ठाणे
----
१) जिल्ह्यातील कोतवालांची मंजूर पदे - १८३
२) कार्यरत पदे - ११९
३) रिक्त पदे - ६४