अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात एवढा रस का..?
By संदीप प्रधान | Published: August 14, 2023 09:54 AM2023-08-14T09:54:22+5:302023-08-14T09:54:56+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यावर ठाण्यात आले व त्यांनी ठाण्यात क्रांती करण्याची भाषा केली.
संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यावर ठाण्यात आले व त्यांनी ठाण्यात क्रांती करण्याची भाषा केली. ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे, तर पुणे अजित पवार यांचे अन् नागपूर देवेंद्र फडणवीस यांचे अशी सत्तेची व सत्तेमधील तिन्ही पक्षांच्या बालेकिल्ल्यांची विभागणी केली जाऊ शकते. यातून संघर्ष टळू शकतो. मात्र, सध्या राजकीय सोयीकरिता एकमेकांचा हात धरलेल्या या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना हे ठाऊक आहे की, भविष्यात जर राजकारणात स्वबळावर टिकायचे तर एका पक्षाने दुसऱ्याला गिळल्याखेरीज सत्तेचा मोठा वाटा पदरात पडणार नाही. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेला गिळून राष्ट्रवादीला मोठे व्हायचे आहे. शिंदे यांनीही मध्यंतरी पुण्यात शिवसैनिकांची बैठक घेतली.
मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेचे फिसकटल्यावर राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार ही जर तडजोड होती तर सध्याचे महायुतीचे सरकार हीदेखील तडजोड आहे. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे राहणार की नाही, याबाबत सतत वावड्या उठतात. ठाण्यातील कार्यक्रमाला अजित पवार अथवा देवेंद्र फडणवीस हजर राहिले नाही की, मतभेदांची कुजबुज सुरू होते. कार्यबाहुल्याने थकवा आल्यामुळे शिंदे गावी आराम करायला गेले तर ठाण्यासह महाराष्ट्रात अफवांचे पीक आले. मध्यंतरी फडणवीस यांनी शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार, असे सांगितले. अजित पवार यांनी पुण्यात आम्हा दोघा उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रिपदावर डोळा नाही, असे जाहीर केले. मात्र, तरीही अनिश्चितता, अफवा थांबत नाहीत. याचे कारण भाजपमध्ये सर्व निर्णय दिल्लीत होतात.
ठाण्यातील राजकीय सौहार्द संपले
- ठाण्यात आतापर्यंत दोन पक्ष प्रबळ राहिले. एक शिवसेना तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस. शिवसेनेकडे सत्ता राहिली तर राष्ट्रवादी विरोधक. अर्थात ठाण्यातील नेते एकमेकांचे वैरी कधीच नव्हते. एका ताटात खात होते. जनादेशाच्या मोडतोडीमुळे ठाणे ही रणभूमी बनलेय. एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड एकमेकांचे वैरी बनले. शिंदे व राजन विचारे हे परस्परांच्या विरोधात उभे राहिले.
- सत्तेत सेना-भाजप एकत्र असले तरी शिंदेशाहीवर भाजपचे आमदार संजय केळकर तोंडसुख घेताना दिसतात. मुंबईबरोबर ठाणे महापालिकेच्या चौकशीची मागणी करतात. शिवसैनिक भाजपच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडतात.
- कालपर्यंत आव्हाडांची सावली होऊन फिरणारे आनंद परांजपे हे आता आव्हाडांच्या नावाने कडाकडा बोटं मोडू लागलेत. राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना धमक्या देत आहेत. गुन्हे दाखल करीत आहेत. ठाण्याच्या राजकारणातील सौहार्द, समंजसपणा जनादेश धाब्यावर बसविल्याने संपला आहे.
- पवारांनी शिंदेंना ठाण्यात गिळले तर पवार टिकणार आणि फडणवीस यांनी पवार-शिंदे यांचे पाय कापले तर भाजपला स्वबळावर सत्ता प्राप्त होऊन पक्षाच्या उपाशी आमदारांना सत्ता दिसणार, अशी विचित्र गळाकापू अवस्था सध्या आहे.