मीरारोड - मीरारोडच्या नया नगरमधील बाणेगर शाळा मार्गवर अतिक्रमण करणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांच्या हातगाड्या जेसीबीने तोडल्या जातात पण शहरातील अन्य भागात मात्र अशी कार्यवाही महापालिका प्रशासन का सातत्याने करत नाही? असा सवाल केला जात आहे .
मीरा भाईंदरमध्ये फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिकेने फेरीवाला पथके नेमून त्यांना महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, बाऊन्सर, वाहने , कर्मचारी वर्ग असा मोठा ताफा दिला असून त्यासाठी वर्षाला काही कोटींचा खर्च होत आहे. त्यावर उपायुक्त मारुती गायकवाड, विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण सह संबंधित प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांच्या नियंत्रणा खाली कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु शहरातील दोन्ही रेल्वे स्थानक परिसर , मुख्य नाके व रस्ते हे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने व्यापलेले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना चालण्यास पदपथ व रस्ते मोकळे राहिलेले नाहीत. तर वाहतुकीची कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रासले आहेत.
फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्या ऐवजी त्यांना वीज पुरवठा सारख्या सुविधा गैरमार्गाने दिल्या जात आहे. तर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणास संरक्षण देण्या मागे मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी व आर्थिक उलाढाल असल्याचा आरोप केले जात आहेत. शहरात फेरीवाल्यांवर सातत्याने ठोस अशी कारवाई कुठे होताना दिसत नसली तरी नया नगरच्या बाणेगर शाळा परिसरात मात्र महापालिका अधून मधून का होईना हातगाड्या तोडण्याची कारवाई करत आली आहे. नुकतीच पुन्हा एकदा पालिकेने येथील फेरीवाल्यांच्या ८० हातगाड्या जेसीबीने तोडून टाकल्या. तर शहरात अन्यत्र मात्र अशा प्रकारची ठोस कारवाई सातत्याने तर सोडाच पण अधून मधून सुद्धा होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. यामुळे फेरीवाल्याना संरक्षण देण्यात अर्थपूर्ण साटेलोटे असल्याच्या आरोपांना बळ मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.