ठाणे : क्लस्टरच्या दुसऱ्या टप्प्यातील सहा आराखड्यांना शुक्रवारी झालेल्या महासभेत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता अंतिम मंजुरी दिली. परंतु, दुसरीकडे याच मुद्यावरून भाजपच्या काही नगरसेवकांनी यावर आक्षेप घेऊन क्लस्टर राबवत असताना जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप प्रलंबित का ठेवला, असा सवालही केला आहे. जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासासाठी सातत्याने होणारी मागणी दुर्लक्षित करून क्लस्टरला तातडीने मंजुरी देऊन ठामपा प्रशासन कोणाचे हित सांभाळत आहे, असा सवालही भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी केला.
या संदर्भात महासभेच्या दिवशी नगरसेवक सुनेश जोशी यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना निवेदन देऊन विचारणा केली आहे. महासभेत क्लस्टर मंजुरी वेगाने होत असताना जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाबाबत होत असलेल्या चालढकलीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. जुन्या ठाण्यातील धोकादायक इमारतीतील रहिवासी जीव मुठीत धरून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर सतत अन्याय होत आहे. जुन्या ठाण्यातील पुनर्विकासात अडथळा ठरणारे सहा मीटरचे रस्ते नऊ मीटर करण्याबाबत महापालिकेच्या महासभेत दोन वर्षांपूर्वी ठराव झाला आहे. तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. कलम २१० द्वारे आयुक्तांना अधिकार आहेत. त्याचा वापर करून प्रशासन जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाचा रखडवलेला मार्ग मोकळा करू शकते. परंतु, काही विशिष्ट राजकीय नेते, काही मोठे विकासक यांच्या छुप्या युतीने जुन्या ठाण्याचा पुनर्विकास रोखून धरला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपचा क्लस्टरला विरोध नाही. मात्र, क्लस्टर मान्यतेने अनधिकृत इमारती, चाळी यांनाही संरक्षण मिळणार आहे. तेथे राहणा-या रहिवाशांना न्याय मिळणार आहे. परंतु, जुन्या ठाण्यातील अधिकृत इमारतीत राहणा-यांना न्यायाच्या प्रतीक्षेत ठेवण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला आहे.