सुरेश लोखंडे, ठाणेठाणे : जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावर शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत इमारतीतील विद्युतपुरवठ्याची संपूर्ण वायरिंग जळाली. ती पूर्ववत करण्यासाठी दोन दिवसांपासून यंत्रणा राबत आहे. पण, धोकादायक म्हणून घोषित असणारी ही इमारत काही महिन्यांनंतर खाली करावीच लागणार. त्यापेक्षा त्यावरील संभाव्य खर्च टाळणेच हिताचे आहे.शुक्रवारच्या आगीत ‘व्हीडी कॉन्फरन्स’ हॉलचीही संपूर्ण वायरिंग जळाली असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींशी आॅनलाइन संपर्क असलेल्या संग्राम कक्षाचीदेखील हीच परिस्थिती आहे. यासह लेखा विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासाठी विद्युत व टेलिफोन कनेक्शनचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. पण, अल्प कालावधीसाठी होणारा हा खर्च व काही महिन्यांपूर्वीचा खर्च निष्फळच ठरणार आहे. त्यापेक्षा ही दोन दालने अन्यत्र हलविणेच योग्य ठरणार आहे.पदाधिकाऱ्यांच्या ‘प्रगती’ या नव्या इमारतीमध्ये या अधिकाऱ्यांची व्यवस्था करणे शक्य आहे. या इमारतीमध्ये गेस्ट रूमचा मोठा हॉल आहे. याशिवाय अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवासस्थानेही मोठमोठी आहेत. तसेही पदाधिकारी येथे राहण्यास फारसे इच्छुक नसतातच. त्यांना मिळालेल्या वाहनातून ते सतत मतदारसंघ व जिल्ह्याच्या दौऱ्यावरच असतात. तसेही या इमारतीआधी कोणाचीही येथे निवास व्यवस्थादेखील नव्हतीच. वर्ष-दीड वर्षात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नवीन इमारत झाल्यानंतर सर्व कार्यालये त्यात समाविष्ट होतीलच. त्यामुळे या इमारतीवरील संभाव्य खर्च वेळीच थांबवणे शहाणपणाचेच आहे. नाहीतर, या इमारतीच्या चारपैकी तीन मजले पाडण्याचा सल्ला मिळालेला आहेच. ठाणे जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये मुख्यालयाची ही इमारत बांधली आहे. आता तब्बल सुमारे ५३ वर्षे झाली आहेत. प्रारंभी ती एक मजली होती.
धोकादायक इमारतीत नवीन वायरिंग कशासाठी?
By admin | Published: November 14, 2015 11:39 PM