ठाणे : एकीकडे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या भूमिपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी कल्याणला येत असतांना दुसरीकडे कळवा आणि मुंब्रावासियांवर अन्याय का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी शहरात फलकबाजीकरून आयुक्तांना केला. सत्ताधाऱ्यांकडून आम्हांला अपेक्षा नाही. परंतु, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी त्यात केली आहे. सध्या कळवा, मुंब्राकर मेट्रोपासून वंचित का? आयुक्त जयस्वाल उत्तर द्या अशा आशयाच्या या फलकांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मेट्रो चारच्या प्रकल्पाच्या कामाला ठाण्यात सुरुवात झाली आहे. तर कल्याण - भिवंडी मेट्रोच्या कामाचे भूमिपुजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत मेट्रोचीही बांधणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये कळवा आणि मुंब्य्राच्या एकाही भागाचा समावेश नसल्याने आव्हाड यांनी कळवा आणि मुंब्राकर मेट्रोपासून वंचित का? असे फलक लावले आहेत.खासदारांचे दुर्लक्षमेट्रोची लाईन कुठे न्यायची हे काम वास्तविक खासदाराचे असते. परंतु, त्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही. सत्ताधाºयांकडूनही आम्हाला काहीचअपेक्षा नाहीत, त्यामुळेच आयुक्त जयस्वाल यांनी मेट्रोसाठी काहीतरी करावे, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. मुख्य मेट्रो किंवा अंतर्गत मेट्रोत कळव्याचा आणि मुंब्य्राचा समावेश करावा असेही त्यांचे म्हणणे आहे.