डोंबिवली : मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमधील गोरगरिबांची घरे पाण्याखाली गेली. आयुष्याची पुंजी साठवून घर घेणाऱ्या तळागळातील नागरिकांचे संसार रस्त्यावर आले असून, याला जबाबदार कोण? कोणाच्या आशीर्वादाने शहरात चाळी उभ्या राहत आहेत. एकीकडे महापालिका चाळींमधली घर घेऊ नका, असे आवाहन करत असताना रातोरात उभ्या राहणाºया चाळी प्रशासनाला दिसत नाहीत का? असा सवाल मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे.
पाटील यांनी टिष्ट्वट करत यासंदर्भात महापालिका प्रशासन, सत्ताधारी यांच्यावर झोड उठवून नाराजी व्यक्त केली. संसार उघड्यावर आले त्यात रहिवाशांचा दोष काय? परवडणारी घरे घेतानाही त्यांची फसवणूक होत आहे. बांधणारे चाळी बांधून पैसा कमवून निघून जातात, पण रहिवाशांवर टांगती तलवार कायम असते. त्याचे काय? राज्य व केंद्र सरकारच्या परवडणाºया दरांत घरे या घोषणेचे काय झाले? की अनेक घोषणांप्रमाणे ही योजनाही कागदावरच राहिली का?, असा सवालही त्यांनी केला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, असे ते म्हणाले.दुसरीकडे, पश्चिमेतील स्थिती पाहावत नाही का, अशी टीका माजी नगरसेवक रणजीत जोशी यांनी केली. खाडीकिनारी बांधलेल्या चाळींमध्ये पावसाचे पाणी गेले. त्यामुळे तेथील गोरगरिबांचे आतोनात नुकसान झाले आहे. आता त्यांना सरकार, महापालिकेकडून मदत मिळेल, पण त्यांनी वर्षांनुवर्षे अशाच दडपणाखालीच राहायचे का? असा सवाल त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की, महापालिका प्रशासन झोपले आहे का? की झोपेचे सोंग घेत आहे? ज्या अधिकाऱ्यांच्या कालावधीत अशी बांधकामे उभी राहिली त्यांच्यावर तातडीने कारवाई होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी कोणतीही चौकशी समिती वैगरे नेमून वेळ दवडण्यापेक्षा राजरोसपणे खारफुटीच्या नियमांचे उल्लंघन करून जी काम झाली आहेत, ती कोणाच्या आर्शीवादाने झाली हे बघावे. आजी-माजी अधिकारी कोणीही असोत त्यांना त्याचा जाब विचारावा.आयुक्तांनी पाहणी करून कारवाई करावीपश्चिमेतील बेकायदा बांधकामांसंदर्भात आयुक्त गोविंद बोडके यांना वेळोवेळी पत्र देऊनही ते पाहणीही करायला येत नसल्याचे जोशी म्हणाले. गेल्या आठवड्यातही येथील अनेकांचे संसार पाण्याखाली असतानाही बोडके पाहणी करायला आले नाहीत, ही नागरिकांची शोकांतिका आहे, असे जोशी म्हणाले. बोडके यांनी पाहणी करून काही गैर आढळल्यास तातडीने संबंधित अधिकाºयांवर हलगर्जी, दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून कारवाई करावी, असेही ते म्हणाले.