उमेश जाधव
टिटवाळा-: कल्याण तालुका पंचायत समिती चे कार्यालय गोवेली येथे स्थलांतर करण्यास पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधी चा विरोध का? या बाबत तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिक संतप्त झाले आहेत.
कल्याण तालुका पंचायत समितीचे प्रशासकीय काम सध्या धोकादायक इमारतींमध्ये काम सुरू आहे. रुख्मिणीबाई रुग्णालया जवळ असलेल्या या इमारतीमध्ये सध्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना बसण्यास जागा नाही. येथे आपल्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच बसण्यासाठी जागा, शौचालयाची सुविधा आशा अनेक गोष्टी नाहीत. त्यामुळे या तालुका पंचायत समितीच्या कार्यालयात सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरीक ये -जा करण्याचे टाळत आहेत. पावसाळ्यात तर ठिबक सिंचन सुरू असलेल्या या इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य, पशुवैद्यकीय विभाग, पाणी पुरवठा विभाग यांना पुरेशी जागा नसल्याने अडगळीच्या जागी सुरू आहेत. तर शिक्षण विभागाचा कारभार अंधेरी कोठडीत सुरू आहे. या धोकादायक इमारतीत शायकीय कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. या धोकादायक इमारतीमध्ये कारभार करणे सुरक्षित नसल्याने हे कार्यालय अन्यत्र स्थलांतर करण्याच्या हालचाली गेली दोन वर्षांपासून सुरू झाल्या आहेत.
कल्याण पंचायत समितीचे कार्यालय तालुक्यातील गोवेली येथे स्थलांतरित करण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या, मात्र हा प्रस्ताव पंचायत समितीच्या आधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लाल फितीत गुंडाळुन ठेवला आहे. विशेष म्हणजे गोवेली परिसरातील दहा पंचायत समिती, तर जिल्ह्या परिषदेचे पाच सदस्य आहेत. असे असून देखील यांना सदरचे कार्यालय गोवेली येथे सुरू व्हावे असे वाटत नाही. यामुळे नागरिकांतून नाराजीचा सुर निघत आहे.
गोवेली येथे दोन एकर जमीन उपलब्ध
तालुका पंचायत समितीची गोवेली येथे दोन एकर जमीन आहे. येथे तीन इमारती बांधून धूळखात पडल्या आहेत. तसेच येथे प्राथमिक आरोग्य केंद्रा ची इमारत ही पडून आहे. गोवेली हे ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाण आहे. मात्र अधिकारी वर्गाची नकारात्मक मानसिकता त्यात पदाधिकांऱ्याची आणि पंचायत समितीच्या सदस्यांची नकारात्मक मानसिकता यामुळे गोवेली येथे तालुका पंचायत समिती कार्यालय स्थलांतराचा खोळंबा झाला आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
कल्याण येथे पंचायत समितीचे कार्यालय आसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होते आहे. हे कार्यालय गोवेली येथे सुरू झाल्यास ग्रामपंचायत आणि तालुका पंचायत समिती मध्ये समनव्य साधला जाऊन विकासला हातभार लागेल - भगवान कोर, सामाजिक कार्यकर्ते
गोवेली येथे तालुका पंचायत समिती कार्यालय सुरू झाल्यास, ग्रामीण भागातील विकासाला वेग येईल.- सोमनाथ टेभे , माझी सरपंच बापसई, ग्रामपंचायत
कल्याण ऐवजी गोवेली येथे पंचायत समितीचे कार्यालय सुरू करण्यासाठी सर्वांशी चर्चा करू- पांडुरंग म्हात्रे, उपसभापती, पंचायत समिती कल्याण,