कल्याण : कल्याण-मुरबाड असो की अन्य रेल्वेमार्ग त्याची कामे आमदारांच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यामुळे त्या आधारे मी पक्ष का सोडू? सोशल मीडियावर मला भाजपा सोडण्याचा सल्ला देणाऱ्यांनी एकदा मतदारसंघात येऊन मी केलेली तीन हजार कोटींची कामे पाहावी आणि मग कॉमेंट करावी किंवा सल्ले द्यावे, अशी टीका आमदार किसन कथोरे यांनी विरोधकांवर केली.‘मुरबाड रेल्वमार्गाला ठेंगा,’ या लोकमतमधील बातमीसंदर्भात ते बोलत होते. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे त्याची पूर्तता ते जातीने लक्ष घालून करतीलच. या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. या प्रकल्पासाठी खासदार कपील पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. रेल्वेशी संबंधित कामे आमदारांच्या अखत्यारीत येत नाहीत. ही रेल्वे प्रत्यक्षात येईपर्यंत वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांचे विविध प्रकल्प मार्गी लावल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.कल्याण-माळशेज मार्गाच्या चौपदरीकरणासाठी १२०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. शहापूर- कर्जत- खोपोली हा मार्ग तयार करण्यासाठी ८०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून मुरबाड मतदारसंघातील रस्ते विकासाच्या कामांसाठी जवळपास २०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. बदलापूरच्या रस्त्यांसाठी एमएमआरडीएने जवळपास १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत, असा तपशील कथोरे यांनी पुरवला. कल्याण ग्रामीण आणि बदलापुरात विकासकामे सुरु आहेत. मुरबाडच्या गावातील रस्ते साडेपाच मीटर रुंदीचे करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते सिमेंट कॉन्क्रिटचे होत आहेत, असे त्यांनी सांगितले.आघाडी सरकारच्या काळात मी दोन वेळा आमदार होतो. त्यावेळी एमएमआरडीएकडून एक कोटीचा निधी मिळविण्यासाठी बराच पाठपुरावा करावा लागत होता. भाजपा सरकारमध्ये फारसा पाठपुरावा न करता एमएमआरडीएने २०० कोटीचा निधी रस्ते विकासासाठी दिला. यातच सारे काही आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.>सर्वाधिक विकासनिधीपक्षाकडून मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. सगळ््यात जास्त विकासनिधी मला मिळाला आहे. मग मी कशाला भाजपा सोडू? असा प्रतिसवाल कथोरे यांनी केला.
टीकाकारांसाठी मी भाजपा का सोडू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 3:31 AM