डोक्यातच गोळी का झाडली? सीआयडी करणार संजय शिंदेंची चौकशी

By जितेंद्र कालेकर | Published: September 26, 2024 07:01 AM2024-09-26T07:01:19+5:302024-09-26T07:01:57+5:30

मुंब्रा पोलिसांकडून घेतला कागदपत्रांचा ताबा

Why was Akshay Shinde shot in the head CID will investigate Sanjay Shinde | डोक्यातच गोळी का झाडली? सीआयडी करणार संजय शिंदेंची चौकशी

डोक्यातच गोळी का झाडली? सीआयडी करणार संजय शिंदेंची चौकशी

ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आराेपी अक्षय शिंदे याचा कथित पोलिस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) बुधवारी याबाबतची काही कागदपत्रे ताब्यात घेतली. 
तसेच अक्षयचा पोलिसांवरील हल्ल्याचा प्रयत्न आणि त्याचा गोळीबारात झालेला मृत्यू, अशा दाेन गुन्ह्यांची माहितीही सीआयडीने घेतल्याची माहिती सूत्रांनी  दिली. सीआययूचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयच्या वर्मी गोळी घालण्याऐवजी त्याला पायावर गोळी घालून जखमी का केले नाही, याचीही चौकशी सीआयडी करणार आहे.

पुणे  सीआयडीचे विशेष पाेलिस महानिरीक्षक सारंग आव्हाड आणि नवी मुंबईच्या काेकण भवन येथील सीआयडीचे अधीक्षक राहुल वाघुंडे यांनी मुंब्रा पाेलिसांकडून संपूर्ण दिवसभर या चकमकीशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यांनी मुंब्रा बायपास परिसरास भेट देऊन स्वतंत्रपणे चाैकशी सुरू केली. या भागात वावर असलेल्या स्थानिकांकडून काही माहिती मिळते का? घटनास्थळाजवळ काही पुरावे मिळतात का? या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपशील घेतला जाणार असून, ज्या वाहनामध्ये हा थरार घडला, त्या वाहनाचीही सीआयडी पथक पाहणी करणार आहे.

कथित पाेलिस चकमकीतील अक्षयच्या मृत्यूचे, तसेच त्याने पाेलिसांवर केलेल्या कथित गाेळीबाराचे राज्यभर पडसाद उमटले. यावरून सत्ताधारी आणि विराेधक यांच्यातही आराेप-प्रत्याराेपांच्या फैरी झडत आहेत.

पोलिस अधिकऱ्यांची स्वतंत्र चाैकशी

घटनास्थळाचा पंचनामा, तक्रार दाखल करून घेणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडूनही सीआयडीने माहिती घेतली. तळाेजा कारागृह ते मुंब्रा बायपास या प्रवासात अक्षयला पाेलिस व्हॅनमधून ठाण्याकडे घेऊन जाणारे सीआययूचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संजय शिंदे, अक्षयच्या गाेळीबारात जखमी झालेले सहायक पाेलिस निरीक्षक नीलेश माेरे यांच्यासह अन्य दाेन अंमलदारांची स्वतंत्र चाैकशी केली जाणार आहे. 

या प्रश्नांची उत्तरे शोधणार

पोलिस अधिकाऱ्याच्या हातातून काेणत्या परिस्थितीत अक्षयने पिस्तूल हिसकावले?, ते लाॅक हाेते का?, माेरे यांच्या पायालाच कशी गोळी लागली?, अक्षयच्या थेट वर्मी गाेळी घालण्याऐवजी शिंदे यांनी त्याच्या पायावर किंवा अन्यत्र गाेळी का झाडली नाही?, अक्षयला केवळ जखमी करण्याचा पर्याय का निवडला नाही?, अशा प्रश्नांची उत्तरे सीआयडी अधिकाऱ्यांना शोधायची असल्याची माहिती एका वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्याने दिली. 

अधिकाऱ्यांकडून खासगीत समर्थन

अक्षयसारखा आराेपी प्रक्षुब्ध झाल्यानंतर त्याच्या गाेळीबारात एखादा अधिकारी मारला जाण्याची वाट पाहायची का, असा सवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगीत केला. पिस्तूल साफ करताना पोलिस जखमी हाेण्याच्या  किंवा मृत्यूच्या घटना घडल्याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
 

Web Title: Why was Akshay Shinde shot in the head CID will investigate Sanjay Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.