ठाणे : एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येण्याकरिता महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षात कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मागील सरकारने कुठल्याही प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली नाही, असे आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे केले. सर्व पुरावे व कागदपत्रे सोबत घेऊन आपण हे आरोप करीत असल्याचे ते म्हणाले.
काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, एअरबस प्रकल्पाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची भूमिका स्पष्ट नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प राज्यातून गेला. उत्तम काम करीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाहक बदनाम केले जात आहे.
सामंत म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या उपसमितीची दीड वर्षात एकही बैठक घेतली नाही. सरकार गेल्याचा राग त्यांच्या मनात असू शकतो, पण किती खोटे बोलायचे याला मर्यादा हवी, असा टोला माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. अडीच वर्षांत बल्कड्रग प्रकल्पासाठी संवाद साधला नसल्याचा आरोप सामंत यांनी केला.
या मोठ्या प्रकल्पांना दिली मान्यता
विद्यमान सरकारमध्ये १० मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यात सिनारामस पल्प अँड पेपर (२० हजार कोटी), सोलार इंडस्ट्रीज (३७८ कोटी), महाराष्ट्र सिमलेस (३७५ कोटी), सनफ्रेश अँग्रो (६६२ कोटी), वरूण बेवरेजेस (७७९ कोटी), विठ्ठल कॉर्पोरेशन (१२६ कोटी), आयएफबी रेफ्रिजरेटर्स (४०० कोटी), जेनक्रेस्ट बायो प्रॉडक्ट (६५० कोटी), मेगा पाईप्स (७५८ कोटी) आणि ग्रासिम (एक हजार ४० कोटी) यांचा समावेश असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
पवारांनी कधीही गद्दार म्हटले नाही
माझा राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे, पण मी चारवेळा निवडणूक लढलो आणि निवडून आलो. मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलो म्हणून शरद पवार यांनी कधी गद्दार म्हटले नाही, खोक्यांची भाषा केली नाही, असे सामंत म्हणाले. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे त्यांनी कौतुक केले. ठाकरे सरकारच्या काळात मराठी उद्योजकांना कोणी त्रास दिला हेही समोर आले पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी केली.