सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३, हिराघाट ते डर्बि हॉटेल रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या १५ पेक्षा जास्त दुकानावर मंगळवारी पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केली. या कारवाईमुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघणार आहे.
उल्हासनगरात मुख्य ७ रस्त्यासह अन्य रस्त्याच्या पुनर्बांधणीने काम महापालिकेने सुरू केले आहे. नेताजी चौक ते कैलास कॉलनी रस्ता पुनर्बांधणीला अडसर ठरणाऱ्या चौकातील असंख्य दुकानदारांना यापूर्वीच नोटिसा दिल्या आहेत. तर गेल्या महिन्यात कॅम्प नं-३, पवई चौकातील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या १५ पेक्षा जास्त घरे व दुकानावर महापालिका अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई केली. हिराघाट येथील १७ सेक्शन ते डर्बि हॉटेल रस्त्याचे रुंदीकरण होणार असून रस्त्याच्या आड येणाऱ्या दुकानदारांना महापालिकेने यापूर्वीच नोटिसा दिल्या होत्या. मंगळवारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दुपारी असंख्य दुकानावर पाडकाम कारवाई केली. पाडकाम कारवाई वेळी पोलीस संरक्षण घेतल्याने, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शहरात विकास कामाला वेग आला असून बहुतांश रस्ते शहर विकास आराखड्या ऐवजी जैसे थे बांधले जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठी समस्या उभी ठाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.