ठाणे: नव्या केंद्रीय कायद्यानुसार विदेशी वन्य प्राणी पाळण्यासाठी आता वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. ती नसल्यास या कायद्याखाली कारवाई केली जाणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून वन्यप्राणी मगरीच्या पिलाच्या विक्रीसाठी आलेल्या यश पारगावकर (२१) याला सापळा रचून अटक केल्याची माहिती ठाणे वनविभागाने गुरुवारी दिली. त्याला १२ जुलैपर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
एक व्यक्ती मगरीच्या पिलाच्या तस्करीसाठी मुंबई उपनगरातील आयआयटी पवई गेट समोर जोगेश्वरी लिंक रोडवर येणार असल्याची गोपनीय माहिती ठाण्याचे उप वनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या पथकाला मिळाली होती. त्याच आधारे सापळा रचून मगरीचे पिल्लू विक्रीस आलेल्या यश या आयआयटी, मुंबई भागातील तरुणाला या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून मगरीच्या पिल्लाची सुटका करण्यात आली आहे. उप वनसंरक्षक सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राकेश भोईर, मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते, वनपाल संदीप यमगर आणि वनरक्षक मिताली महाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
मगर हा प्राणी वन्यप्राणी, वन्यजीव संरक्षण अधिनियम ९७२ च्या अधिसूची-१ मध्ये मोडत असल्याने त्याची विक्री आणि पाळण्यास मनाई आहे. तसे आढळल्यास सात वर्षांच्या शिक्षेची आणि २५ हजारांच्या दंडाची तरतूद आहे. आरोपी पारगावरकर याच्या विरोधात मुलुंड परिमंडळात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.