ठाणे : ईस्टन एक्सप्रेस हायवे येथे वन्य पक्षी आणि प्राण्यांची तस्करी करणाऱ्यास ठाणे वन विभागाने अटक केले. तसेच त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रजातीचे एकूण ४९ पोपट आणि खारूताई जप्त केली आहे. यामध्ये ४२ पोपट आणि ७ खारूताईंचा समावेश आहे. याप्रकरणी तस्कराला अटक करण्यात आली आहे.
ठाणे कोपरी येथील श्री माँ शाळेसमोर ९ डिसेंबरला वन्य पक्षी आणि प्राणी घेऊन एक जण येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून एकाला ताब्यात घेत,त्याच्याकडून ४२ पोपट आणि ७ खारूताई असे ४९ वन्य पक्षी आणि प्राणी जप्त केले आहेत. तसेच वन्य पक्षी आणि प्राणी यांची विनापरवाना बंदिस्त करून वाहतूक करून आणल्याने वन्य जीव सरंक्षण अधिनियम १९७२ (सुधारीत २००३ ) चे कलम २,२(१६),९,३९,४८,४८(अ),४९,अ, ब ५० व ५१ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. ही कारवाई ठाण्याच्या सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल संजय पवार , वनरक्षक एस एस मोरे, दत्तात्रय पवार या पथकाने ठाणे वन्यजीव प्राणी संघटनेच्या मदतीने केली. वन्य पक्षी प्राणी स्वतःजवळ पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे. वन्यजीव विषयक कोणतीही तक्रार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे यांनी केले आहे.