कल्याण : केडीएमसीच्या आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत एक प्रभाग, एक नगरसेवक याच पद्धतीने प्रक्रिया पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर २७ गावे महापालिकेत राहणार की वगळली जाणार या चर्चांनाही आता उधाण आले आहे. एकीकडे गावे वगळण्यासाठी स्थानिकांचा दबाव वाढत असताना गाव महापालिकेतून वगळायची असतील तर यासंदर्भात राज्य सरकारला होणाºया निवडणुकीपूर्वी सहा महिने आधी निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा २७ गावांसह महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडेल,अशी माहिती जाणकारांनी दिली.केडीएमसीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुका पॅनलप्रमाणे झालेल्या नाहीत. त्यामुळे २०२० आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक पॅनल पद्धतीनेच होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब झाले. पण, या निवडणुका पार पडताना २७ गावांसह त्याची प्रक्रिया होईल का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. महापालिकेची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसारच होणार आहे. केडीएमसी परिक्षेत्राची लोकसंख्या त्या जनगणनेनुसार १२ लाख ४७ हजार ३२७ असली तरी ती लोकसंख्या आजच्या घडीला १४ लाखांच्या आसपास गेली आहे. यात २७ गावांमधील लोकसंख्या दोन लाख ७१ हजार ४३५ इतकी आहे. २७ गावे केडीएमसीतून वगळा अशी मागणी सातत्याने होत आहे. यासाठी साडेचारवर्षे स्थानिक नागरिकांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी अशी मागणी केली आहे. जर गावे वगळली तर महापालिकेचे क्षेत्रही बदलणार आहे. त्यामुळे प्रभागांची रचनाही नव्याने होईल. लोकसंख्येचे प्रमाणही बदलेल. २७ गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यासंदर्भात राज्य सरकारने १४ मे २०१५ ला अध्यादेश जारी केला होता. त्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. महापालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत १० नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे आता जर २७ गावे वगळण्याबाबत निर्णय घ्यायचा असेल तर तो सहा महिने आधी म्हणजेच एप्रिलच्या अखेरपर्यंत राज्य सरकारने घेणे अपेक्षित आहे. अन्यथा आहे त्याच परिस्थितीतच निवडणुका होतील. त्यामुळे गावे वगळण्याच्या मुद्यावर ठाम असलेल्या संघटना आणि महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांचीही पुढील दिशा काय ठरते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार२७ गावे महापालिकेतून वगळली गेलीच पाहिजे, या गावांची नगरपालिका व्हावी ही स्थानिक नागरीकांची मागणी आहे. महापालिका का नको आणि नगरपालिका का हवी याबाबतचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. महापालिका निवडणुका आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होत आहेत. परंतु तत्पूर्वी २७ गावे वगळण्याबाबत ठाम निर्णय सरकारने घ्यावा, अशी आमचीही आग्रही मागणी आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाणार असल्याचे २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले.
२७ गावे केडीएमसीतच की वगळणार?, निर्णयासाठी सहा महिनेच हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 5:43 AM