ठाणे: निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी जातीवाचक, जातीचा अपमान होईल अन् चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल असे विधान केले असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्मकार समाजाचा तसेच संविधानाचा अवमान झाला असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे. या संदर्भात चौकशी करुन दोन दिवसात अॅट्रोसिटी, संविधानाचा अवमान आणि मराठा समाजाला दलितांविरोधात चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त अंबोरे यांनी दिले आहे.
राजाभाऊ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आरक्षणावरुन दिशाभुल करणारे किर्तन इंदोरीकर हे करीत असल्याचे दिसून येत आहे.त्यामध्ये इंदोरीकर महाराज म्हणतात की, अरे जाती-बिती सरकारने काढल्या. सुताराला घर फुकाट द्या मराठयाचं पाडून टाका. चांभाराचं साहेब करुन टाका मराठयाचा वरातीला सोडा. नाचू द्या. आख्खी रात... नोकरीला गेल्यावर त्याची जात पहा... नोकरीला गेल्यावर पहिली काय पाहता? जात.. अन् आपल्याला नाव काय दिलंय सरकारनं खुला.. जन्माला आल्यावर खुला.. मरताना खुला मध्ये बी खुला... ज्याला जमिन नाही त्याला पाईन लाईन, ज्याला विहीर नाही त्याला मोटार, आपण खुला! तुमच्या जातीचा मिळाल्यावर आमचा घरी डांबता, पण तर तरी घ्याल का नाही? अशी विधाने करतानाच अश्लील शिवीदेखील दिली आहे.
इंदोरीकर यांच्या या विधानामुळे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. चांभाराला साहेब करा.. हे विधान करत असतांनाच मराठा समाजाला चर्मकारांच्या पोलीस ठाणे अंमलदार वर्तकनगर पोलीस ठाणे ’विरोधात चिथावणा देण्याचा प्रयत्न इंदोरीकर यांनी केला आहे. शिवाय, आरक्षण हे संविधानाने दिलेले असल्याने संविधानिक तरतुदींच्या विरोधात जाहीर वक्तव्ये करुन संविधानाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे चव्हाण यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.चव्हाण यांच्या फिर्यादीवर चौकशी करुन दोन दिवसांमध्ये इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त अंबोरे यांनी सांगितले.
यावेळी अॅड. राजय गायकवाड, अॅड. राजू पराड, अॅड. निलेश मोहिते, अॅड. भुजंग मोरे, अॅड. विठ्ठल हुबळे वंचित बहुजन आघाडीचे सुखदेव उबाळे, सुरेश कांबळे, राहुल घोडके, शकुंतला अवसरमोल, रंजना म्हस्के, अमोल ढगे, अमोल पाईकराव, सुभाष अहिरे, गोपाळ विश्वकर्मा, सुखराम चव्हाण, संतोष खरात, वैभव जानराव, संभाजी काचोळे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे वर्तक नगर पोलीस ठाण्यात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.