लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : कापडावर ५ ऐवजी १२ टक्के जीएसटी लागू झाल्याच्या निषेधार्थ मुंबईतील कापड व्यापाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून कापडखरेदी बंद केल्याने शहरातील यंत्रमागमालक चिंतित झाले असून तूर्त कापड उत्पादन बंद करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली, तर शहरातील यंत्रमाग बंद पडून कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.केंद्र शासनाने जीएसटी लागू करण्यापूर्वीच कापड व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला होता. यापूर्वी कापडावर ५ टक्के कर आकारला जात होता. जीएसटी लागू झाल्याने अतिरिक्त सात टक्के करवाढ झाल्याने कापड व्यापाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला असून आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेत टिकून राहणे कठीण झाले आहे. पूर्वी केवळ यार्नवर ५ टक्के टॅक्स आकारला जात होता. आता यार्न, ग्रे कापड व पक्के कापड या तीन ठिकाणी वेगवेगळे कर द्यावे लागल्याने एकूण १२ टक्के कर द्यावा लागणार आहे. देशातील कापडाची मुख्य बाजारपेठ असलेल्या मुंबई, सुरत, पाली, जोधपूर, दिल्ली या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी कापडखरेदीवर बहिष्कार घातला आहे. या बेमुदत बहिष्कारामुळे शहरातील यंत्रमागधारक धास्तावले आहेत. ‘एक देश, एक कर’ हे जर जीएसटी लागू करण्यामागील मुख्य धोरण असेल, तर कापडावरच तीन टप्प्यांवर करआकारणी कशी, असा सवाल कापड व्यापारी व यंत्रमागधारक करीत आहेत. सध्या चिनी कापडावर ४ टक्के, पाकिस्तानी कापडावर ६ टक्के कर आहे. भारतात ५ टक्के कर होता, तेव्हा या दोन्ही शेजारील राष्ट्रांशी भारतामधील कापड स्पर्धा करीत होते. आता जीएसटीमुळे ही स्पर्धा अशक्य असून या कराचा विपरीत परिणाम यंत्रमागांवर होऊ शकतो.उपासमारीची वेळ येणारआता १२ टक्के कर आकारला गेल्यावर चीन तसेच पाकिस्तानमधील कापडाशी स्पर्धा अशक्य होणार आहे. सरकारने लवकर जीएसटी कपातीचा निर्णय घेतला नाही, तर यंत्रमाग बंद होतील व पर्यायाने कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.
भिवंडीतील यंत्रमाग बंद होणार?
By admin | Published: July 05, 2017 6:13 AM