अजित मांडकेठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघ २६ वर्षांनंतर शिवसेनेकडून भाजपकडे जाणार, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. त्याचवेळी ठाण्याची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे. महायुतीमध्ये असंतोष निर्माण होऊ नये यासाठी शिंदेसेना, भाजपकडून मेळावे घेत उमेदवार कोणीही असो महायुतीला विजयी करण्याच्या आणाभाका घेतल्या जात आहेत. ठाणे गमावले तर शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश जाणार असून पुढे त्याचे पडसाद उलटू शकतात.एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे पालन करण्यास शिवसैनिक तयार आहे. महाराष्ट्रातूनच ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणू, असा शब्द पंतप्रधानांना दिला आहे. त्यात ठाण्याची जागापण आहे. सर्वांत जास्त मताधिक्याने ठाण्यातील उमेदवार निवडून आला पाहिजे, असे शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लोकमतला सांगितले आहे.
मागील निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना ३ लाख २८,८२४ मते मिळाली होती. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ दोन्ही शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरला आहे. यापूर्वी हा मतदारसंघ १९९६ पर्यंत भाजपच्या ताब्यात होता. दिवंगत आनंद दिघे यांनी खेळलेल्या खेळीमुळे मागील २६ वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. भाजपने पुन्हा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी दावा केला आहे.
ठाण्याची जागा भाजपला देतो, भाजपने त्यांना पसंत असलेला उमेदवार देत. त्याला आमच्या चिन्हावर लढवा, असा प्रस्ताव शिंदेसेनेनी भाजपला दिला होता पण तो मान्य झाला नाही. ठाण्याची जागा भाजपच्या पारड्यात गेली तर त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येतील. ठाणे लोकसभा भाजपकडे गेली तर माजी खासदार संजीव नाईक यांचे नाव आघाडीवर आहे. नाईक यांना पुत्राच्या विजयासाठी मतदारसंघात ठाण मांडून बसावे लागेल. नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि ठाणे शहर येथे भाजपचे आमदार असून संघटनात्मक ताकद आहे.