अनिकेत घमंडी डोंबिवली : भाजपने राज्याच्या सत्तास्थापनेत स्वारस्य नसल्याचे जाहीर केल्यानंतर सत्तेची समीकरणं बदलली. त्यासोबतच जिल्ह्यातील भाजप नेते, आमदारांची मंत्रीपदांची स्वप्नंही भंगल्यात जमा आहेत. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ आमदार किसन कथोरे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, आमदार गणपत गायकवाड आदींना मंत्रीपदाची अपेक्षा होती. परंतु, सत्तेच्या सारिपाटावर या सर्वांचाच हिरमोड झाला आहे.राज्यमंत्री चव्हाण यांचे कॅबिनेट मंत्रीपदाचे स्वप्न होते. आमदार किसन कथोरे, आमदार गणेश नाईक यांनाही भाजपचे सरकार आल्यास चांगल्या खात्याचे मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यापैकी आमदार गायकवाड हे यापूर्वी दोनवेळा अपक्ष निवडून आले आहेत. यावेळी पहिल्यांदाच ते भाजपच्या तिकिटावर कल्याण पूर्व येथून निवडून आले. आमदार केळकर यांनी ठाण्याचा गड यंदाही राखला. रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली मतदारसंघामधून विजयाची हॅट्ट्रिक मारली. आमदार कथोरे हे आधी राष्ट्रवादीचे तर आता भाजपचे आमदार असून, यावेळी ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाला मंत्रीपदासोबतच ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही अपेक्षा होती.निवडणुकीच्या तोंडावर माजी महसूलमंत्री गणेश नाईक यांनी भाजपने त्यांच्या मुलासाठी तिकीट घेऊन तडजोड केली. ते निवडूनही आले. परंतु, आता भाजपचे सरकारच स्थापन होत नसल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे बाहेरून भाजपमध्ये आलेल्यांचा फायदा झाला की नाही, या संभ्रमात जिल्ह्यातील आमदार असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. मीरा-भार्इंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी निवडून आल्यावर भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अनेकांना मंत्रीपदापासून महामंडळांपर्यंतची अपेक्षा होती. ते आता मिळणार नसून सर्वांनाच पक्षसंघटना मजबुतीसाठी काम करावे लागणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून भाजपमध्ये आलेले आमदार कथोरे, नाईक हे आता अशा परिस्थितीत भाजपमध्ये रमतील का, हेदेखील लवकरच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे भाजपचे अनेक आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील काही आमदारांचा समावेश असेल का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.राज्यमंत्री चव्हाण यांनाही कॅबिनेटचे स्वप्न होते. पक्षाने त्यांना मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपद तसेच रायगड आणि पालघरच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी दिली होती. अल्पावधीत फडणवीस सरकारने आपल्याला बरेच काही दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे काहीही झाले तरी पक्षासाठी काम करायचे, हे सूत्र पक्षाने शिकवले आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करताना स्पष्ट केले.>मनसेचे प्रमोद पाटील यांना राज्यमंत्रीपद? राज्यातील संभाव्य सरकारमध्ये मनसेचे एकमेव आमदार प्रमोद पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाळी दिली. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये मनसेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. या सत्तासंघर्षात आमदार पाटील यांचा निसटता विजय झाला. पण, तरीही राज्यात खाते उघडल्याचे समाधान मनसेला आहे. त्यामुळे संभाव्य सरकारमध्ये राजू पाटील यांनाही राज्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा मनसैनिकांना आहे. मनसैनिकांनी तशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या असून, काहीही होवो डोंबिवलीकरांना मंत्रीपद मिळणारच, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
भाजप आमदारांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:56 AM