लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे क्लासेस क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जवळपास दीड वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही सर्व क्लासेस बंद ठेवावे लागले आहेत. परिणामी संचालक, शिक्षक, कर्मचारी यांना आपला उदरनिर्वाह करणे कठीण जात आहेत. कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने स्वतःहून मागील वर्षी मार्च महिन्यात शासनाला सहकार्य म्हणून क्लासेस बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत हे सर्व क्लासेस बंदच आहेत. क्लासेस नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करणे शक्य आहे, तसे निवेदनही संघटनेने शासनाला व सर्व मंत्र्यांना दिलेले आहे. मात्र, आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले जात असून क्लासेस सुरू करण्यास परवानगी दिली जात नाही, म्हणून महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, असा इशारा क्लासेस संचालक संघटनेने दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरी कमी झाल्यावर कुठे शाळा सुरू झाल्या होत्या. ऑनलाइन शाळा तर वर्षभर सुरू होत्या. त्यांना त्यांची फी पूर्ण घेण्याचा अधिकार आहे, असेही हायकोर्टाने सांगितले आहे; परंतु क्लासेस बंद आहेत. क्लासेसमध्ये विद्यार्थी संख्येनुसार विद्यार्थ्यांचे नियोजनबद्ध पद्धतीने वर्ग सुरू करता येऊ शकतात, हे आम्ही पटवून सांगितले होते. शासन दरबारी व अन्य मंत्री यांना क्लासेस संचालकांनी निवेदने दिली आहेत. मात्र, क्लासेस सुरू करण्यास अद्यापपर्यंत परवानगी दिलेली नाही. क्लासेस बंद असल्याने क्लासेस संचालकांना शिक्षकांचे पगार, अवाच्या सवा येणारे लाइट बिल, रूम भाडे व घर खर्च हे चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही धनदांडग्या श्रीमंत लोकांच्या ऑनलाइन व्यवस्थेला हाताशी धरून सामान्य क्लासेस संचालकांना संपवण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र यांनी केला आहे. क्लास संचालकांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व क्लासेस संचालक हे बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहोत, असा इशारा महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी दिला आहे.