- हितेन नाईक पालघर : लोकसभा निवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्यातील सर्व डिझेल परताव्याच्या थकीत रक्कमेचे वाटप केले जाईल, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मच्छीमार प्रतिनिधींना दिला. मात्र निवडणुका होऊन वर्ष उलटूनही जिल्ह्यातील मच्छीमारांची ७ कोटी ४० लाखांची देणी थकीत आहेत. त्यामुळे तात्काळ या रक्कमेचे वाटप करण्याचे आदेश देत मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा, अशी मागणी मच्छीमारांमधून होत आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी पालघरमध्ये एप्रिल २०१९ मध्ये आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची जिल्ह्यातील मच्छीमार प्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पालघरच्या ठाणे जिल्हा मच्छीमार संघाच्या कार्यालयात भेट घेतली होती. त्या भेटीत डिझेल परताव्याची ११० कोटी रुपयांची वर्षभरापासून थकीत असलेली रक्कम मिळावी यासह अनेक प्रलंबित प्रश्नावर उपाययोजना आखण्याची मागणी केली होती. त्या मागणीवर सकारात्मक विचार करून प्रथम डिझेल परताव्याची रक्कम देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करू, असे आश्वासन देत तुमच्या मागण्यांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास दिला होता. परंतु मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतर अजूनही परतावा थकीत ठेवण्यात आला आहे.सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थांची वर्षभरापासूनच्या डिझेल परताव्याची थकीत रक्कम दोन कोटीच्या वर पोचली असून जिल्ह्यातील ४५ सहकारी संस्थांची रक्कम सुमारे ७ कोटी ४० लाख रुपयांची असल्याचे संस्था प्रतिनिधींचे म्हणणे आहे.‘आमचेच पैसे, परत मिळण्यात उशीर का?’डिझेल वापराचे सर्व पैसे भरणा करूनही परताव्याचे ‘आमचेच पैसे, आम्हाला मिळण्यात एवढा उशीर का?’ असा प्रश्न मच्छीमार उपस्थित करीत आहेत. या मिळणाऱ्या रकमेतून आम्हाला येणाºया मासळी हंगामासाठी जाळी, बोटींची डागडुजी, कामगारांची अनामत रक्कम देणे आदी गरजा भागवायच्या असल्याचे सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी सांगितले.
"डिझेल परताव्याचा दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळतील का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 4:14 AM