ठाणे: कोरोना संकट आणि त्यामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. त्यातच वीज कंपन्या अव्वाच्या सव्वा बिलं पाठवत असल्यानं सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. याविरोधात आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणाच्याही घरातील वीज कापली गेल्यास मनसे एमएससीबीसोबत सरकारी कार्यालयांमधील वीज कापू, असा इशारा मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. कोरोनामुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यात आता त्यांना वाढीव वीज बिलं पाठवून आणखी मनस्ताप देण्यात येत असल्याचं जाधव म्हणाले. 'ठाण्याच्या हिरानंदनी भागातील एका महिलेला आधी हजार रुपये बिल यायचं. आता ते थेट २० हजारांवर गेलं आहे. त्या महिलेची तक्रार ऐकून घेण्यासाठी गेलो असता, तिथे आणखी १०० माणसं भेटली. त्यांचीदेखीस तिच तक्रार होती. आधी ज्यांना २ हजार रुपये बिल यायचं, त्यांना आता २० हजारांचं बिल पाठवण्यात येत आहे,' असं जाधव म्हणाले.'सध्या कोरोनामुळे अनेकजण घरीच थांबले आहेत. त्यामुळे २ हजार रुपये येणारं वीज बिल तीन-साडे तीन हजार आल्यास समजू शकतो. पण ते थेट २० हजार कसं काय येतं?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारनं घर मालकांना, दुकान मालकांना भाडं वसूल न करण्याचं आवाहन केलं. अनेकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मग आता सरकारनं गेल्या तीन महिन्यांचं वीज बिल माफ करावं, अशी मागणी जाधव यांनी केली. ठाण्यात कोणाचीही वीज कापली गेल्यास मनसे एमएससीबीसह सरकारी कार्यालयांची वीज कापेल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. आधीच अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. अनेकांना पगार मिळालेले नाहीत. काहींना बिनपगारी सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. अशा व्यक्तींनी वीज बिलं कशी भरायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सध्या लोकांना कोरोनापेक्षा वीज बिलाची भीती वाटू लागली असल्याचं ते म्हणाले.
कोणाच्याही घराची वीज कापलीत तर...; विजेच्या वाढत्या बिलांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:33 AM