लोकमत न्यूज नेटवर्क / स्नेेहा पावसकर
ठाणे - अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे; त्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी तेच दहावीतील टक्केवारीचे निकष लावणार आणि त्यातून आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार का, याकडे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे. यंदा कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या; त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावले. बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के आणि मुलांचेही गुण ९० टक्क्यांच्या पुढे आहेत. अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले. साहजिकच यामुळे अकरावी प्रवेशाची चुरस वाढणार हे नक्की होतं; पण शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र हायकोर्टाने तो निर्णय रद्द ठरविला. त्यामुळे आता पु्न्हा अकरावीचे प्रवेश होताना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, अशी चिंता विद्यार्थ्यांना आहे.
ठाणे जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी १ लाख २४ हजार ९१ विद्यार्थी होेते. त्यांपैकी १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांत ६६८४५ मुले, तर ५७२४६ मुली आहेत.
---------
महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार
आधीच कोरोनामुळे निकषांच्या आधारे लागलेल्या निकालात नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. १०० टक्के गुणही अनेकांना मिळाले. त्याच गुणांच्या आधारे आता प्रवेश होणार असतील तर त्यामुळे महाविद्यालयांचे कटऑफ वाढणार आणि प्रवेशाची चुरस अधिक वाढणार हे नक्की.
---------
आधी आम्ही परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास केला. मात्र नंतर अंतर्गत मूल्यमापन करून दिले. नंतर सीईटीच्या दृष्टीने अभ्यास केला; तर आता त्याच गुणांच्या आधारे प्रवेश देणार असे स्पष्ट केले. शासनाने योग्य वेळी एकच ठाम निर्णय घेतला नाही. त्यात आमचे नुकसान झाले. आता आम्हाला मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल.
- राखी बांडे, विद्यार्थिनी
----------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीची परीक्षा रद्द केली योग्य; पण आता सीईटी ऑनलाईन घेता आली असती. आम्हाला यंदा अभ्यास करून निकालासाठी उपयोग झाला नाही. गेल्या वर्षी थोडा कमी अभ्यास झाला होता; पण तेच गुण ग्राह्य धरल्याने त्याचा परिणाम आता आमच्या महाविद्यालयीन प्रवेशावर होईल.
- सोहम महाडेश्वर, विद्यार्थी
--------
आता १४ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे; पण अनेक विद्यार्थी चांगले कॉलेज मिळेल की नाही या भीतीत आहेत. राज्य सरकार सीईटीच्या तयारीत होते; मात्र हायकोर्टाने निर्णय रद्द केल्याने तशा पद्धतीने नियोजित प्रवेश प्रक्रिया बारगळली, असे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व्यक्त केले.